14 November 2019

News Flash

“शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या अमिताभ यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा”

"केबीसीमध्ये जाणीवपूर्वक खोडसाळपणे शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला"

केबीसी मध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख

‘कौन बनेगा करोडपती’ या रिअ‍ॅलिटी शोच्या ११ व्या पर्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन, सोनी वाहिनी, मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस स्थानकामध्ये यासंदर्भात संभाजी ब्रिगेडने अर्जही दिल्याचे समजते. अनेकांनी सोशल मिडियावर केबीसीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी नाराजी व्यक्त करत या मालिकेवर बंदी घालण्याची मागणीही केली होती.

संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी या प्रकरणाबद्दल संघटनेची भूमिका स्पष्ट केली. “केबीसीमध्ये जाणीवपूर्वक खोडसाळपणे उत्तरांच्या पर्यायांमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा’ उल्लेख फक्त ‘शिवाजी’ असा ‘एकेरी’त केला गेला. हे निषेधार्ह आहे. महाराजांची बदनामी करणाऱ्या बच्चन, सोनी वाहिनी आणि संबंधितांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,” अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण

गुजरातच्या शाहेदा चंद्रन या हॉटसीटवर बसल्या होत्या. त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या पर्यायांमध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला गेला. ‘यापैकी कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यासाठी चार पर्याय देण्यात आले.
१. महाराणा प्रताप
२. राणा सांगा
३. महाराजा रणजीत सिंह
४. शिवाजी

या प्रश्नाचे स्क्रीनशॉर्ट सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. अनेकांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती.

First Published on November 8, 2019 9:34 am

Web Title: file a case against amitabh bachchan for disrespecting shivaji maharaj scsg 91