प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे सोमवारी प्रदीर्घ आजाराने हैदराबादमधील रुग्णालयात निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. निशिकांत गेल्या दोन वर्षांपासून लिव्हर सिरॉसिर Liver Cirrhosis या आजाराने त्रस्त होते. ३१ जुलै रोजी त्यांना हैदराबादमधील एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तेव्हापासून त्यांची प्रकृती सातत्याने खालावत होती. अखेर सोमवारी (१७ ऑगस्ट) दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निशिकांत यांच्या निधनानंतर कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक मराठी व हिंदी कलाकारांनी कामत यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दृष्यम, मदारी, मुंबई मेरी जान यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटातून निशिकांत कामत यांनी आपला ठसा बॉलिवूडमध्ये उमटवला आहे. त्याआधी डोंबिवली फास्ट या चित्रपटाचं दिग्दर्शन केल्यानंतर निशिकांत कामत हे नाव सर्व महाराष्ट्राला परिचीत झालं. डोंबिवली फास्ट चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याव्यतिरीक्त जॉन अब्राहमच्या रॉकी हँडसम चित्रपटात निशिकांत कामत यांनी खलनायकाची भूमिका केली.