पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सध्या विविध क्षेत्रांवर त्यांच्या या निर्णयाचे पडसाद उमटलेले पाहायला मिळत आहेत. अनपेक्षितपणे समोर आलेल्या चलनसंकटापासून चित्रपटसृष्टीही दूर राहीलेली नाही. नुकताच प्रदर्शित झालेला ‘फोर्स २’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला खरा. पण, दैनंदिन व्यवहाराच्या कोलमडलेल्या गणितांचा फटका या चित्रपटालाही बसला आहे. प्रदर्शनानंतर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ६ कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाच्या कमाईचे हे आकडे प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितले आहेत.

या चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जॉन अब्राहम महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यामुळे या आठवड्याच्या शेवटी तरी या चित्रपटाच्या कमाईवर काही फरक पडणार का, हे पाहण औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने दैनंदिन व्यवहारातून ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घतल्यामुळे सध्या त्या निर्णयाचे परिणाम पाहायला मिळत आहेत. फक्त या एकाच चित्रपटावरच नाही तर, चित्रपट सृष्टीमध्ये इतरही काही चित्रपटांचे वेळापत्रक कोलमडून पडले आहे. काही चित्रपटांच्या चित्रीकरणाटची तारीखही बदलण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.

जॉन आणि सोनाक्षीच्या या चित्रपटाला सध्या चांगल्या प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. प्रेक्षक आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरण्यात या चित्रपटाला यश मिळाले आहे. या चित्रपटामध्ये सोनाक्षी सिन्हा आणि जॉनची अफलातून अॅक्शन दृश्ये पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळत आहेत.