17 February 2020

News Flash

मालिकांच्या सेटवर जुळणारे मैत्रीचे बंध

मालिकांचे सेट ही एक वेगळी दुनिया असते. दिवसाचे दहा ते बारा तास शूटिंग, मेकअप, टेक्स-रिटेक्स या सगळ्यात दिवस कसा निघून जातो हे कोणत्याच नटाला कळत

| August 3, 2014 12:39 pm

मालिकांचे सेट ही एक वेगळी दुनिया असते. दिवसाचे दहा ते बारा तास शूटिंग, मेकअप, टेक्स-रिटेक्स या सगळ्यात दिवस कसा निघून जातो हे कोणत्याच नटाला कळत नाही. दिवसाच्या अखेरीस हिशोब लावल्यावर लक्षात येतं, बापरे! आपण घरापेक्षा जास्त वेळ या सेटवरच घालवतो आहोत. मग सेटवरच सगळ्यांचं एक कुटुंब बनून जातं. मग एकमेकांशी गप्पा मारणं, भांडणं, रुसणं सगळं त्या सेटवर असतं. कधी जेवणाचे डब्बे वाटून घेतले जातात, तर कधी सुखदु:ख. पहिला पाऊसही एकमेकांसोबतच अनुभवला जातो आणि कित्येकांच्या पहिल्या कमाईचा आनंदही येथेच साजरा केला जातो. या सेटवर उलगडणाऱ्या मैत्रीच्या बंधावर टाकलेला छोटासा दृष्टिकोन.
 सकाळी आठ वाजता कलाकारांचा दिवस उजाडतो. मग प्रत्येकाची शर्यत सुरू होते मेकअपदादासमोरची खुर्ची पकडायची. एकदा स्वत:ला मेकअपदादांच्या स्वाधीन केलं की प्रत्येक कलाकाराची भूमिकेच्या रंगात रंगायची सुरुवात होते. मग शूटिंग, टेक-रिटेक, संवाद पाठांतर या सगळ्यात ते गढून जातात. मध्येच दिग्दर्शक ‘ब्रेक’ची घोषणा करतो आणि सगळे जण आपल्या मूळ स्वरूपात परत येतात. हाच तो क्षण असतो, जेव्हा प्रत्येक जण आपल्या मूळ रूपात येतो. सेटवरची नाती यानिमित्ताने फुलू लागतात. या सगळ्यांना जुळणारा एकच समान धागा असतो तो म्हणजे मैत्रीचा. कोणत्याही नात्यांच्या पलीकडे जाऊन मैत्रीच्या नात्याने सेटवर सर्व जण जोडलेले असतात. प्रत्येक जण वेगवेगळ्या पाश्र्वभूमीतून आलेला असतो.
प्रत्येकाकडे त्याची अशी सांगण्यासारखी एक वेगळी कहाणी असते आणि या कहाण्यांना या मोकळ्या वेळांमध्ये वाट मोकळी करून दिली जाते. स्टार प्लसवरील ‘वीरा-एक वीर कि अरदास’ मधील शिविन नारंगच्या म्हणण्यानुसार, आम्ही दिवसाचे बारा-पंधरा तास सेटवरच असतो. त्यामुळे सगळ्यांशीच छान मैत्री झालेली असते. आम्ही एकमेकांना खूप गोष्टी सांगतो. सेटवर मी, विशाल आणि फरनाज आम्ही तिघेही एकाच वयाचे आहोत, त्यामुळे आमच्यात खूप गप्पागोष्टी होतात.
त्यामानाने दिगंगना छोटी आहे, त्यामुळे बऱ्याच गोष्टी तिला सांगणे आम्ही टाळतो. त्यातही विशाल आणि माझ्या काही खास गुजगोष्टीही सतत होत राहतात. त्यात या मुलींना जागा नसते.
   सेटवरच्या या मैत्रीच्या नात्याला ना वयाचे बंधन असते ना पडद्यावरील भूमिकांचे. पडद्यावर कट्टर वैऱ्यांची भूमिका साकारणारे प्रत्यक्षात मात्र जिवाभावाचे मित्र असल्याची कित्येक उदाहरणे आहेत. अगदी पडद्यावर खाष्ट सासू आणि गरीब सोशीक सुनेच्या भूमिका साकारणाऱ्या दोघी प्रत्यक्षात मात्र घट्ट मैत्रिणी असतात. ‘कलर्स’च्या ‘बेईन्तेहा’ मालिकेमध्ये सासू-सून ‘सुरय्या आणि आलिया’ यांच्यात छत्तीसचा आकडा आहे, पण प्रत्यक्षात मात्र त्यांच्यात अत्यंत खेळीमेळीचे वातावरण आहे. सुचित्रा पिल्लई वयाने आणि अनुभवाने प्रीतिका रावपेक्षा मोठी असली तरी त्या सेटवर जिवाभावाच्या मैत्रिणी आहेत. ‘आम्ही दोघी सेटवर प्रचंड गप्पा मारत असतो. आमच्या गप्पांनी अख्खं युनिट थक्क होऊन जातं,’ असं प्रीतिका सांगते. इतकंच नाही तर सुचित्रा यांना मी इतके आवडते की त्यांना मी बाहुली वाटते, असं प्रीतिका सांगते.
 सेटवरचं खाणं आणि मैत्री यांचाही फार जवळचा संबंध असावा. छानछान खायला आवडत नाही असा माणूस पृथ्वीतलावर सापडणं कठीण आहे. मालिकांचे सेटही याला अपवाद नाहीत. जेवणाची सुट्टी झाल्याझाल्या कोणाच्या डब्यातून कसला वास येतोय याचा अंदाज घेण्यास सुरुवात होते. त्यात काही ठरावीक डब्यांवर सेटवरील प्रत्येकाचा डोळा असतो. मालिकांच्या सेटवर डब्यांच्यावरून होणारे किस्से खूप प्रसिद्ध आहेत. ‘स्टार प्रवाह’वरील ‘पुढचं पाऊलं’ मालिकेमध्ये जुई गडकरी पडद्यावर घाबरलेली, बुजरी असली तरी खाण्याच्या बाबतीत सर्वात पुढे असल्याचे सांगते. चवीने खाणारे या एका नाळेने ते सर्व कलाकार जोडले गेले असल्याचे ती सांगते. दररोज सेटवर आल्यावर कुठे काय छान खायला मिळते, याच्या चर्चा सर्वात जास्त रंगत असल्याचे ती सांगते. एकेदिवशी संध्याकाळी सेटवर आम्हाला खूप भूक लागली होती आणि सेटजवळचे हॉटेल सुरू झाले नव्हते. असे असूनही आम्ही तेथील आचाऱ्याला खूप विनवण्या करून आमच्यासाठी मांसाहारी जेवण बनवायला लावल्याचे, गमतीने ती सांगते.
 सेटवरची ही जिवाभावाची मैत्री केवळ सेटपर्यंतच मर्यादित असते असेही अजिबात नाही. ‘झी मराठी’वरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतील मधुगंधा आणि शर्मिष्ठा यांच्याबाबतीत असेच काहीसे आहे. सेटच्या बाहेरही फारशी मित्रमैत्रिणी नसलेली शर्मिष्ठा, मधुगंधाच्या रूपाने आपल्याला सेटवरची खूप जवळची मैत्रीण मिळाल्याचे सांगते.
ती माझ्या मोठय़ा बहिणीप्रमाणे मला मानसिक आणि भावनिकरीत्या मदत करते. असे असले तरी तिच्याशिवाय माझे सेटवर काही अडते असंही नाही. आम्ही सेटवर खूप भांडतो, एकमेकांवर पाणी उडवतो, खेळतो, अगदी रात्री झोपताना पलंगावरून भांडतोसुद्धा. त्या वेळी आपल्या आजूबाजूला कोणी आहे की नाही याची आम्हाला अजिबात काळजी वाटत नाही, असे ती सांगते. सेटवर आम्ही लाडाने एकमेकींना टॉम-जेरीवरून ‘जेरीगंधा’ आणि ‘टोमिष्ठा’ असंही म्हणतो.  
 मालिकांमधील बच्चेकंपनीसुद्धा तितकीच मजा करत असतात. सब टीव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील टप्पूसेना आम्ही सगळे एकमेकांचे जीव की प्राण आहोत असेच सांगतात. ही बच्चेकंपनी एकमेकांना शूटिंगमध्येच नाही तर अभ्यासामध्येसुद्धा मदत करते. थोडक्यात, सेटवरची मैत्री या मंडळींना प्रत्यक्षातही खूप काही शिकवून जाते.

First Published on August 3, 2014 12:39 pm

Web Title: friendship at serial sets
टॅग Friendship Day
Next Stories
1 अस्सल विनोदी!
2 ‘आयदान’ जातजाणीव अन् स्त्रीत्वाचे भोग
3 ..अमानुष बनाके छोडा!
Just Now!
X