बॉलिवूड अभिनेत्री गौहर खानच्या वडिलांचे निधन झाले आहे. आज ५ मार्च रोजी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गौहरच्या वडिलांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

गौहर खानची मैत्रीण प्रीती सिमोसने सोशल मीडिया पोस्टद्वारे गौहरच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. प्रीतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गौहरच्या वडिलांचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘माझ्या गौहरचे वडील… ज्यांच्यावर माझे प्रचंड प्रेम होते… ज्यांनी त्यांचे आयुष्य अभिमानाने जगले…’ अशा आशयाचे कॅप्शन देत तिने श्रद्धांजली वाहिली आहे.

गौहरने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला काही फोटो शेअर करत रुग्णालयात असल्याचे सांगितले होते. हा फोटो शेअर करत तिने ‘कृपया माझ्या वडिलांसाठी प्रार्थना करा’ असे कॅप्शन दिले होते. तर दुसरा फोटो तिने वडिलांच्या हातावर हात ठेवून शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तिने ‘माय लाइफलाइन’ असे म्हटले होते.