माणसाच्या मनातील देवाची प्रतिमा आणि तिच्याभोवती असलेले कुतूहल हे कित्येक पिढय़ांपासून कायम आहे. उलटपक्षी प्रत्येक पिढीच्या संकल्पनेनुसार माणूस आणि देवाच्या नात्याकडे एका नव्या पद्धतीने पाहण्याची दृष्टी मिळत गेली आहे. त्यामुळे ‘देव’ या विषयाबद्दलची उत्सुकता काळानुसार वाढतच गेली आहे. मालिकांच्या विश्वातही दर वेळी देवाची निरनिराळी रूपं दाखवली गेली आहेत. शंकर, गणपती, श्रीराम इथपासून ते थेट खंडोबापर्यंत विविध स्वरूपांतील देवांचे दर्शन वेळोवेळी टीव्हीवर होत आले आहे. लवकरच ‘सब टीव्ही’वरील ‘कृष्ण कन्हैया’ या मालिकेतून एका नास्तिकाला भेटलेला देव आणि त्याला उमगलेला देवत्वाचा अर्थ सांगण्यात येणार आहे. या मालिकेतून जाहिरात, मराठी नाटक आणि चित्रपटांमधील लोकप्रिय चेहरा निखिल रत्नपारखी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेच्या निमित्ताने देवाकडे पाहण्याच्या rv04मालिकांच्या नव्या दृष्टिकोनाविषयी एक अभिनेता म्हणून निखिलला काय वाटतं आहे हे समजून घेण्याचा हा प्रयत्न.
एरव्ही देवाविषयी एखादाही चुकीचा शब्द उच्चारल्यास बंड करून उठणाऱ्यांनाही २०१२मध्ये आलेला चित्रपट ‘ओ माय गॉड’ने देव आणि माणसाच्या नात्याबद्दल एक नवा विचार देऊ केला. संकटाच्या वेळी आठवणारा देव आपला मित्रही होऊ शकतो, हे या चित्रपटाने पटवून दिले. या चित्रपटाने टीव्हीलाही देव आणि त्याविषयीच्या मालिका एका वेगळ्या पद्धतीने मांडण्याची संधी दिली. माणूस दर वेळी आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी देवाकडे जातो. पण तोच देव जर आपल्याला मित्रासारखं मार्गदर्शन करत असेल तर आपल्या समस्या सोप्या होऊ शकतात, हे या चित्रपटाने दाखवून दिले. त्यातूनच या संकल्पनेवर आधारित मालिकाही छोटय़ा पडद्यावर दिसण्यास सुरुवात झाल्याचे निखिल सांगतो. आपल्याला आदरयुक्त भीती असलेल्या देवांकडेही छान विनोदबुद्धी असू शकते. मालिकेत देवाचा समावेश फक्त पुराणकथांपुरता ठेवण्याऐवजी त्यांचे संदर्भ आजच्या जगण्याला लावण्याचा प्रयत्न मालिकांमधून करण्यात आला. ‘निली छत्रीवाले’, ‘बालगोपाल करे धमाल’ यांसारख्या मालिकांमध्ये देव आणि माणसाला भक्तापेक्षा मित्राच्या रूपात सादर केले गेले. ‘यम हैं हम’मध्ये पृथ्वीवरील माणसाचं जीवन पाहून गोंधळलेला यम, चित्रगुप्त आणि त्यांची पृथ्वीवर टिकून राहण्याची धडपड दाखविण्यात आली आहे. स्वर्गात देवांमध्ये छोटी भांडणे लावून मजा लुटणाऱ्या नारदाचे विनोदी स्वरूपही ‘नारद’ मालिकेतून समोर आले आहे. ‘रोल नंबर २१’ काटरूनमधूनही शाळेत मित्राच्या रूपात राहणारा आणि सवंगडय़ांचे रक्षण करणारा कृष्ण मुलांमध्ये लोकप्रिय होऊ लागला. काही वर्षांपूर्वी ‘सारथी’ मालिकेमध्ये नायिकेच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांकडे सूत्रधाराप्रमाणे नजर ठेवणाऱ्या कृष्णाच्या रूपात देवाने दैनंदिन मालिकेतही प्रवेश केला होता.
‘कृष्ण कन्हैया’मध्येसुद्धा देवाला न मानणाऱ्या कन्हैयालालच्या आयुष्यात जेव्हा देव एक मित्र बनून येतो तेव्हा त्याच्या संकल्पनांना कसे छेद बसतात, हे दाखवलं असल्याचं निखिल रत्नपारखी याने सांगितलं. अर्थात, मालिकांमध्ये देवांचं हे बदललेलं रूप केवळ सांगण्यापुरतं नव्हतं. त्यांच्या वागण्यात, पेहरावात आणि राहणीमानातही त्यानुसार बदल करण्यात आले. ‘निली छत्रीवाले’मध्ये शंकराने माणसांप्रमाणे कुर्ता, जॅकेट आणि जीन्स हा पोशाख स्वीकारला आहे; तर बालगोपाल आताही पृथ्वीवर आल्यावर नायकाच्या समस्या सोप्या करण्यापेक्षा त्याची कळ काढून प्रश्नांमध्ये भर घालतो. मालिकांमधील या सहजतेमुळे देवाविषयीची माणसाची आत्मीयता वाढण्यास मदत झाल्याचे निखिल सांगतो. मालिकेतील हे देव नायकांचे प्रश्न सोडवत नाहीत, तर त्यांना प्रश्नांची उत्तरं शोधण्यास मदत करतात. त्यामुळे तो आपल्यातील एक झाल्याचे लोकांना अनुभवायला मिळाल्याचे त्याने नमूद केले. यामध्ये दिग्दर्शकांनीही मालिकांमध्ये हे देव त्यांच्या दिव्य शक्तींचा वापरही करणार नाहीत, याची दक्षता घेतली आहे. त्यामुळे स्वर्गातून आलेल्या यमाला पृथ्वीवर आल्यावर पैशांचे व्यवहार समजून घेण्यास झालेला त्रास आणि त्यांनी काढलेला मार्ग प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. एका अर्थाने या मालिका विनोदी असल्या तरी त्यांचे विनोद मर्यादा ओलांडणार नाहीत याचीही काळजी घेतली जात असल्याचे निखिल सांगतो. आमच्या मालिकेमध्येही प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणाऱ्या विनोदांपेक्षा प्रासंगिक विनोदांना महत्त्व दिलं गेलं आहे हे सांगणाऱ्या निखिलचा ‘कन्हैयालाल’ काहीसा ‘ओह माय गॉड’च्या संकल्पनेवर बेतलेला आहे हे सुज्ञांस सांगणे न लगे. चित्रपटामध्ये कानजीभाई आणि किशनजीची जोडी लोकांना आवडली होती. आता छोटय़ा पडद्यावर कन्हैयालाल आणि कृष्ण कन्हैया यांची कथा प्रेक्षक कसे स्वीकारतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल!