‘स्टार प्रवाह’वरील ‘गोठ’ या मालिकेतील बयोआजी, अर्थात नीलकांती पाटेकर ३ ते ६ एप्रिल या कालावधीत ‘कान्स मीप टीव्ही’ या आंतरराष्ट्रीय फिल्म बाजारमध्ये अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्यासाठी फ्रान्सला गेल्या आहेत. या कानवारीमुळे बयोआजींच्या त्रासातून राधाची चार दिवस का होईना, सुटका होणार आहे.
विलासशी लग्न झाल्यापासून बयोआजीनं नेहमीच राधाला विचित्र वागवलं आहे आणि तिच्या विरोधात कट-कारस्थानं केली आहेत. बयोआजींच्या कारस्थानांना राधा धीरानं सामोरी गेली आहे. त्यातच आता विलास आणि नीला म्हणजेच राधाची बहीण, यांच्यात नव्याने काहीतरी घडतं आहे. विलास आणि नीला जवळ येत असल्याची चाहूल राधाला लागली आहे. या सगळ्यानं राधा अस्वस्थ आहे.
त्यामुळे आता बयोआजी म्हणजेच नीलकांती पाटेकर ‘कान’ला गेल्या असल्यानं चार दिवसांसाठी का होईना, राधाची सुटका होत आहे. या चार दिवसांत राधाला विलास आणि नीला यांच्यात काय घडतंय हे जाणून त्यांना थांबवण्यात यशस्वी होईल का, हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे. सध्या टेलिव्हिजन विश्वात काही गाजणाऱ्या मराठी मालिकांपैकीच एक मालिका म्हणजे ‘गोठ’.
आजही आपल्या समाजात पुरुषसत्ताक संस्कृती असताना या मालिकेतून ‘स्त्रीचे निर्णय तिच्याच हाती’ हा विचार मांडण्यात आला आहे. फिल्मफार्म निर्मित या मालिकेचे दिग्दर्शन विघ्नेश कांबळे करत आहेत. कथानकाला असलेली तळकोकणाची पार्श्वभूमी, तिथली संस्कृती, संस्थानिक घराण्यांचा प्रभाव, बदलते कोकणी जनमानस आणि युवापिढी हे या मालिकेचं वेगळेपण ठरत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 4, 2017 7:27 pm