शब्दांशिवाय चित्रपट किती प्रभावी आणि उत्कृष्ट असू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे चार्ली चॅप्लिन. केवळ हातवारे आणि चेहऱ्यावरील हावभावांच्या जोरावर सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या या महान विनोदवीराची आज १३१वी जयंती आहे. चार्ली चॅप्लिन यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या मृतदेह चोरीचा किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

नेमकं काय घडलं होतं त्यावेळी?

‘द ग्रेट डिक्टेटर’ या चित्रपटातून अडोल्फ हिटलर सारख्या हुकुमशाहालाही थेट आव्हान देणाऱ्या चार्लींचे आयुष्य चित्रपटांप्रमाणेच थरारक होते. अगदी मृत्यृनंतरही या थरारकतेने त्यांची पाठ सोडली नाही. १९७७ साली वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते. त्यानंतर काही दिवसात त्यांचा मृतदेह चोरीला गेला होता. ही आवाक् करणारी घटना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही चोरट्यांनी पैसे मिळवण्यासाठी त्यांचा मृतदेह चोरला होता. पोलिसांनी अथक प्रयत्नातून तब्बल ११ महिन्यानंतर त्या चोरांना शोधून काढले. आश्चर्याची बाब म्हणजे चोरांनी ११ महिेने मृतदेहाला सांभाळून ठेवले होते.

चार्ली चॅप्लिन यांच्या आयुष्यावर एक चित्रपट तयार केला जात आहे. या चित्रपटाचे नाव ‘चार्ली चॅप्लिन: अ मॅन ऑफ द वर्ल्ड’ असे आहे. हा एक डॉक्युमेंट्री प्रकारातील चित्रपट आहे. यामध्ये त्यांचे पडद्यामागचे फोटो आणि व्हिडीओ दाखवले जातील. या डॉक्युमेंट्रीमध्ये त्यांच्या मृतदेह चोरीचा किस्सा देखील दाखवला जाणार आहे. या चित्रपटाची निर्मिती चार्लीची नात कार्मन चॅप्लिन करणार आहे.

चार्ली चॅप्लिन कट्टर कम्यूनिस्ट विचारांचे होते असं म्हटलं जातं. त्यामुळे ७०च्या दशकात त्यांच्या चित्रपटांवर अमेरिकेने बंदी घातली होती. परंतु तरीही अफाट लोकप्रियतेच्या जोरावर १९७३ साली त्यांनी ऑस्कर पुरस्कारावर आपले नाव कोरले होते.