दिग्दर्शक हंसल मेहता यांनी अभिनेता मनोज वाजपेयीशी झालेल्या मोठ्या भांडणाचा खुलासा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला. या भांडणानंतर हे दोघं एकमेकांशी जवळपास सहा वर्षे बोलत नव्हते. इतकंच नव्हे तर कधी एकमेकांसमोर आले तरी ओळख दाखवत नव्हते. ‘दिल पे मत ले यार’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांचं कडाक्याचं भांडण झालं होतं.

‘हफपोस्ट इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत हंसल मेहतांनी सांगितलं, “भांडण मिटवण्यासाठी नेहमीच थोडी तरी शक्यता ठेवली पाहिजे म्हणून मी मनात फार कटुता घेऊन वावरत नव्हतो. तुम्ही कधी कोणाशी कसं भेटाल हे सांगता येत नाही. वीस वर्षांपूर्वी मी आणि मनोजने ‘दिल पे मत ले यार’ या चित्रपटासाठी एकत्र काम केलं होतं. तो माझा खूप चांगला मित्र होता पण शूटिंगदरम्यान एका कारणामुळे आमच्यात खूप मोठं भांडण झालं. त्या भांडणानंतर आम्ही सहा वर्षे एकमेकांशी बोलत नव्हतो. अनेकदा आम्ही एकमेकांसमोर आलो, पण तेव्हासुद्धा ओळख न दाखवता समोरून निघून जायचो. त्यानंतर दस कहानियाँ या चित्रपटासाठी आम्ही संजय गुप्ताच्या घरी भेटलो. तेव्हा कामानिमित्त मनोजशी बोलणं भाग होतं. शूटनंतर आम्ही जेवायला बाहेर गेलो आणि नेमका मनोज माझ्या बाजूला बसला होता. तेव्हापासून आम्ही पुन्हा बोलू लागलो. एका क्षुल्लक वादामुळे आमच्यात सहा वर्षे दुरावा आला होता.”

तो वाद नेमका काय होता याबद्दल त्यांनी पुढे सांगितलं, “मला नीट आठवत पण नाहीये की वाद नेमका कशावरून झाला होता. पण तो एक गैरसमज होता. मनोज त्यावेळी अमेरिकेत होता आणि त्याने मला फोन केला. फोनवरून तो जोरजोरात ओरडत होता आणि माझासुद्धा ताबा सुटला. मीसुद्धा त्याच्यावर ओरडलो आणि फोन कट केला. त्यानंतर आम्ही सहा वर्षांपर्यंत एकमेकांशी बोललो नाही. पण जेव्हा बोलू लागलो, तेव्हा अलिगढसारखा सुंदर चित्रपट करण्याची संधी मिळाली. आम्ही जर बोललोच नसतो तर अलिगढ चित्रपट कधी बनलाच नसता.”

हंसल मेहता यांची ‘स्कॅम १९९२ : हर्षद मेहता स्टोरी’ ही वेब सीरिज सध्या चांगलीच गाजतेय. दुसरीकडे मनोज वाजपेयी यांचा ‘सुरज पे मंगल भारी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.