अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हे एकमेकांना डेट करत असल्याचे सर्वांनाच माहित आहे. या दोघांनीही कधीच आपल्या नात्याची कबुली उघडपणे दिलेली नाही. पण, ते ब-याचदा पार्टी किंवा इतर कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतात. त्यावरूनच यांच्या रिलेशनशीप स्टेटसवर ब-याच चर्चा केल्या जात आहेत. दरम्यान, नुकत्याच आलेल्या माहितीनुसार विराटने त्याच्या प्रेयसीसाठी काही खास केल्याचे कळते. गेल्या काही दिवसांपासून अनुष्का शर्माच्या आगामी ‘फिल्लौरी’ चित्रपटाचा ट्रेलर ट्रेंडमध्ये आहे. एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘फिल्लौरी’च्या सेटवर ब-याचदा उपस्थित राहणा-या विराटने या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.

पिंकविला या संकेतस्थळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विराटला ‘फिल्लौरी’ चित्रपटाची कथा आवडली आणि तो अगदी सुरुवातीपासूनच चित्रपटाच्या कामात सहभाग घेऊ लागला होता. चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी त्याने यात पैसेही गुंतवले आहेत. त्यामुळेच तो स्वतःच्या शैलीत या चित्रपटाची प्रसिद्धी करत आहे.

गेल्या काही दिवसांपासून चित्रपट वर्तुळामध्ये ‘फिल्लौरी’ या चित्रपटाच्याच चर्चा सुरु आहेत. अनुष्का शर्मा आणि दिलजीत दोसांज यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला होता. हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडिया आणि चित्रपट वर्तुळातही अनुष्काच्या आणि दिलजीतच्या या आगामी चित्रपटाच्याच चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या अनुष्का शर्माचा हा ट्रेलर ट्रेंडमध्येही आहे. नववधुच्या रुपातील एका भटकत्या आत्म्याच्या रुपात अनुष्का या ट्रेलरमध्ये दिसते. त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्ताने अनुष्काचे वेगळेच रुप पाहता येणार आहे असे म्हणावे लागेल. या चित्रपटामध्ये काहीसा गतकाळही साकारण्यात आल्यामुळे दोन विविध काळांचं दर्शन चित्रपटातून होणार आहे. पंजाबी अभिनेता दिलजीत दोसांज आणि अनुष्का शर्मा यांची केमिस्ट्रीही पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहता येणार आहे.