अकरा वर्षांपूर्वी मद्यधुंदावस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या प्रकरणाच्या नव्याने होणाऱ्या सुनावणीसाठी अभिनेता सलमान खान मंगळवारी न्यायालयासमोर हजर झाला. मात्र, सलग दुसऱ्यांदा साक्षीदार हजर झाले नाहीत. निवडणूक कामामुळे साक्षीदारांना हजर करता येऊ शकत नसल्याचे सांगत पोलिसांनीच न्यायालयाकडून वेळ मागितला. परिणामी न्यायालयाने फेरखटल्याची सुनावणी २८ एप्रिल रोजी ठेवली आहे.
गेल्या आठवडय़ातही खटल्याच्या सुनावणीच्या पहिल्याच दिवशी साक्षीदारांनी दांडी मारली होती. त्यामुळे न्यायालयाने मंगळवारची तारीख दिली होती. सलमानच्या गाडीच्या धडकेत जखमी झालेल्या साक्षीदारांची मंगळवारच्या सुनावणीत साक्ष नोंदवली जाणार होती. परंतु पोलिसांकडे निवडणूक कामही असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव या साक्षीदारांना न्यायालयासमोर हजर केले जाऊ शकत नाही आणि खटल्याच्या सुनावणीसाठी आपण अद्याप आपण तयार नसल्याची माहिती तपास अधिकारी राजेंद्र काणे यांनी न्यायालयाला दिली. दुसरीकडे सलमानच्या वतीने आपण सुनावणीसाठी तयार असल्याचे सांगण्यात आले. त्यावर २८ एप्रिल रोजी, निवडणुकांनंतर आपण साक्षीदारांना हजर करू, असे सरकारी पक्षातर्फे सांगण्यात आल्यावर न्यायालयाने त्यांचे म्हणणे मान्य करीत सुनावणी तहकूब केली.
दरम्यान, महत्त्वाचा प्रत्यक्षदर्शी व जखमी साक्षीदार तपासला जाणार असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार सलमान मंगळवारी न्यायालयासमोर हजर झाला. सव्वाअकराच्या सुमारास सलमान बहीण अलविरा आणि अंगरक्षक शेरा याच्यासह न्यायालयात दाखल झाला. परंतु १५ ते २० मिनिटांमध्येच कामकाज संपले आणि तो आल्या पावली परतला.