करोना विषाणूमुळे देशात सुरु असलेल्या लॉकडाउनच्या काळात प्रत्येक क्षेत्रातील कामकाज ठप्प झालं होतं. परिणामी, कलाविश्वातील कामकाजही बंद असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतु, याकाळात अनेक सेलिब्रिटींनी घरी राहून त्यांचे छंद जोपासले. काहींनी चित्रकलेत मन रमवलं, तर कोणी बागकामात. विशेष म्हणजे या काळात प्रसिद्ध गायक,संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमिया मात्र काम करत होता. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने घरी राहून काही गाणी तयार केली असून ही गाणी लवकरच श्रोत्यांच्या भेटीला येणार असल्याचं त्याने सांगितलं आहे.

‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणारा हिमेश रेशमिया आज लोकप्रिय संगीत दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. हिमेशने या लॉकडाउनच्या काळात जवळपास ३०० नवीन गाणी तयार केली आहेत. ही गाणी लवकरच प्रदर्शित होणार आहे. हिमेशने राजेश रोशन यांच्या एमएक्स प्लेअर टाइम्स ऑफ म्युझिक यांच्यासोबत करार केला आहे. त्याअंतर्गत हिमेश जवळपास ७०० गाणी तयार करत आहे.

लॉकडाउनच्या काळात तू घरी राहून नेमकं काय केलंस असा प्रश्न हिमेशला विचारण्यात आला होता. त्यावर मी एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहे. या प्रोजेक्टसाठी मला जवळपास ७०० गाणी कंपोज करायची आहेत. ज्यातील ३०० गाणी मी लॉकडाउनच्या काळात घरी राहून लिहिली आहेत. या नव्या प्रोजेक्टमुळे मला वेगवेगळ्या पद्धतीने गाणी कंपोज करण्याची प्रेरणा मिळाली. लवकरच मी या नव्या प्रोजेक्टची घोषणा करणार आहे. कारण माझ्यामते, या प्रोजेक्टमुळे संगीत क्षेत्रातील कालाकारांना नवीन काही तरी पाहायला मिळणार आहे. यात अनेकविध गाण्यांचा समावेश आहे, असं हिमेशने सांगितलं.

दरम्यान, सध्याच्या काळात तरुणाईमध्ये असलेली रिमिक्सची क्रेझ कमी झाली आहे. मला वाटतं आपण खूप रिमिक्स गाणी ऐकली. पण आता एखाद्या ओरिजनल गाण्याकडे वळूयात. त्यामुळे लवकरच तुम्ही मला नव्या गाण्यासह पाहू शकणार आहात, असंही तो म्हणाला.