बॉलीवूडमध्ये हळूहळू आता पाकिस्तानी कलाकारांचे चेहरे दिसू लागले आहेत. यातीलचं एक अभिनेता, गायक असलेला अली झफर हा २०१४ साली किल दिल चित्रपटाद्वारे शेवटचा रुपेरी पडद्यावर दिसला होता. त्यानंतर आता तो गौरी शिंदेच्या आगामी डिअर जिंदगी या चित्रपटाने पुन्हा पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटात तो आलिया भटच्या एका प्रियकराची भूमिका साकारताना दिसेल. पण या दोन वर्षात बरेचं काही बदलले आहे. पाकिस्तानमधील प्रसिद्ध अभिनेता फवाद खान याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले असून त्याच्या कामाची प्रशंसा केली जातेय. त्यामुळे फवाद आणि अली यांच्यात आता तुलना केली जाऊ लागलीयं. त्यावर अलीने आपण फवादच्या यशाने आनंदी असल्याचे एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलेय.
अली म्हणाला की, गेले पाच वर्ष मी इथे काम करतोय. माझ्या कुटुंबापासून मला दूर राहावे लागत होते. या काळात मी फक्त स्काइपवर माझ्या मुलाला मोठं होताना पाहिलं. तो आता पाच वर्षांचा झाला आहे तर माझी मुलगी आता वर्षाची होईल. माझ्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण मी गमावले आहेत. त्यामुळे मी कामापासून ब्रेक घेतला होता. या दरम्यान, मी एक मोठे घर बांधले आहे. त्यात माझा एक मोठा असा स्वतःचा म्युझिक स्टुडिओ आहे, यामुळे माझे स्वप्न पूर्ण झालेय. तू या इंडस्ट्रीकडून काय शिकलास असे विचारले असता अली म्हणाला, ही इंडस्ट्री एका विशिष्ट वेगाने काम करते हे मला कळलेय. पण मला माझ्या पद्धतीने काम करायला आवडते. एकाच वेळेला खूप सारं काम घ्यायला मला आवडत नाही. मी एका वर्षाला एकच प्रोजेक्ट हातात घेतो. जेणेकरूण मी त्यावर व्यवस्थित काम करू शकेन आणि इतरही काही काम मला करता येतील. मला जगभरात फिरायला, गायला, गाणी तयार करायला आवडतात. माझ्या मित्रांसोबत मी स्टुडिओमध्ये बसतो तेव्हा खूप खूश असतो. मी काही आमिर खान नाही. जर मी एकचं प्रोजेक्ट करतोय आणि तो चालला नाही तर त्याचे परिणाम मला वर्षभर भोगावे लागतात. त्यामुळे मी आता अधिक सखोल जाऊन काम करायचं ठरवल असून यापुढे केवळ एकचं प्रोजेक्ट वर्षाला करणार नाही, असे अली म्हणाला.