14 December 2017

News Flash

अजयसोबत माझे नाते असेच राहिल- तब्बू

मी आणि अजय फार चांगले मित्र आहोत

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 12, 2017 4:32 PM

अजय देवगण, तब्बू

बॉलिवूड अभिनेत्री तब्बू सध्या तिच्या ‘गोलमाल अगेन’ या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. मुंबईतील एका प्रमोशन कार्यक्रमात तिला अजय देवगण आणि तिच्या एवढ्या वर्षांच्या मैत्रीबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. अजय आणि तिच्या मैत्रीबद्दल बोलताना तब्बू म्हणाली की, ‘अजय देवगणमुळे माझे लग्न झाले नाही या बातमीनंतर मला अनेकांनी याबाबत विचारले. त्या बातमीचे शीर्षक पाहून अनेकांनाच आश्चर्य वाटले होते. पण जेव्हा त्यांनी संपूर्ण बातमी वाचली तेव्हा त्यांना सत्य काय ते कळले. मी आणि अजय फार चांगले मित्र आहोत.

वेगवेगळ्या लोकांसोबत तुमचे वेगवेगळे नाते असते. अजयसोबतचे माझे नाते असेच वेगळे आहे. आता सगळ्यांसोबतच एकसारखं तर राहता येत नाही. तसेच जी मैत्री माझी अजयसोबत आहे तशी मैत्री इतर कोणासोबतही नाही आणि मला खात्री आहे की आमच्यातले हे नाते असेच राहणार.’

तब्बूने पुढे सांगितले की, ‘मला लोक अनेकदा हाच प्रश्न विचारतात की तू सिनेमात फार कमी दिसतेस. हा सिनेमा तुझा कमबॅक मानायचा का? आता प्रत्येक वर्षी तर माझे सिनेमे येतात. गेल्या वर्षी आलेल्या माझ्या सिनेमांची यादी पाहा. मी सतत काम करतेय. ‘हैदर’, ‘जय हो’, ‘तलवार’, ‘दृश्यम’, ‘फितूर’, आणि आता ‘गोलमाल अगेन’. मला २५ वर्षांपासून हाच प्रश्न विचारला जात आहे. आता तुम्हीच सांगा माझ्यासोबतच या क्षेत्रात आलेल्या किती अभिनेत्री आता चित्रपटांमधून अभिनय करत आहेत.’ सध्या तब्बू ‘गोलमाल अगेन’ या विनोदीपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

हा सिनेमा १९ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या सिनेमात तब्बूसोबत अजय देवगण, अर्शद वारसी, कुणाल खेमू, तुषार कपूर, परिणीती चोप्रा आणि संजय मिश्रा असे तगडे कलाकार आहेत.

या सिनेमानंतर तब्बू एक रोमँटिक सिनेमात दिसेल. या सिनेमात अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘बर्फी’ सिनेमाचा एडिटर म्हणून काम केलेला आकिव अली या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. आकिवचा हा दिग्दर्शनातील पहिला सिनेमा आहे. अजूनपर्यंत सिनेमाचे नाव ठरले नसून पुढच्या वर्षी दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे.

First Published on October 12, 2017 4:32 pm

Web Title: i have very special relationship with ajay devgn says golmaal again actress tabu