मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले चित्रपट दिग्दर्शक संजय जाधव यांचा आगामी ‘लकी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कॉमेडी ड्रामा या प्रकारात मोडणाऱ्या या चित्रपटाची कथा महाविद्यालयीन जीवन आणि आजची तरुणाई यांच्या भोवती फिरताना दिसते. ‘लकी’च्या माध्यमातून दिप्ती सती ही अभिनेत्री पहिल्यांदा मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये दिप्ती बिकिनीमध्ये दिसणार आहे.
बॉलिवूडला अभिनेत्रींचा साइज झिरो लूक, बिकिनी बॉडी आणि हॉट अंदाज हे काही नवीन नाही. मात्र मराठी चित्रपटसृष्टीत याचं प्रमाण फार कमी आहे. मराठीत सर्वात प्रथम अभिनेत्री स्मिता गोंदकरने बिकिनी घातली होती. त्यानंतर आता दिप्तीही तिच्या आगामी चित्रपटात बिकिनी घालणार आहे. त्यामुळे आता मराठी चित्रपटातील अभिनेत्रीदेखील बिकिनी सीन देण्यास तयार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दिप्ती मिस इंडिया फायनलिस्ट ठरली असून तिने आतापर्यंत अनेक दाक्षिणात्य चित्रपट केले आहेत. मात्र लकीच्या माध्यमातून ती पहिल्यांदाच बिकिनी सीन देणार आहे. विशेष म्हणजे या सीनसाठी तिला कॅमेरासमोर येताना संकोचलेपणा जाणवत असल्याचं तिने स्वत: म्हटलं आहे.

‘लकी हा माझ्या करिअरमधील पहिलाच मराठी चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी मी प्रचंड उत्सुक होते. मात्र ज्यावेळी मला या चित्रपटात बिकिनी घालायची आहे असं समजलं. तेव्हा मी प्रचंड नर्व्हस झाले . आतापर्यंत मी अनेक चित्रपट केले आहेत. मराठीतील पहिल्याच चित्रपटामध्ये अशा लूकमध्ये सर्वांसामोरं येणं हे माझ्यासाठी फार कठीण होतं. पण हा सिक्वेन्स चित्रपटाला कलाटणी देणारा ठरणार असल्याचं समजल्यानंतर मी तयार झाले’, असं दिप्ती म्हणाली.
पुढे ती असंही म्हणाली, ‘हा सीन करताना मी कम्फर्टेबल असावं यासाठी संजय दादांनी खूप प्रयत्न केले. खास माझ्यासाठी त्यांनी हा सीन एस्थेटेकली चित्रीत केला. विशेष म्हणजे हा सीन होत असताना दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर आणि माझे हेअर-मेकअप आर्टिस्ट यांच्याशिवाय त्यावेळी सेटवर कोणीही नव्हते. हा चित्रपट तरुणाईवर आधारित असल्यामुळे बिकिनी घालणं हा या कथेचा भाग होता. जसे आपण जिममध्ये जाताना स्पोर्ट्सवेअर घालतो. किंवा कॉलेजमध्ये जाताना जिन्स-टीशर्टमध्ये असतो. तसेच स्विमींगपूलमध्ये टू पीस बिकनी घालतात’.
दरम्यान, आतापर्यंत संजय जाधव यांच्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्री हॉट आणि बोल्ड अंदाजात दिसल्या आहेत. मात्र दिप्ती ही त्यांच्या चित्रपटातील पहिली अशी अभिनेत्री आहे जी बिकिनीत दिसणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी दिप्ती यापूर्वी काही दाक्षिणात्य चित्रपटातही झळकली आहे. इतकंच नाही तर तिने Asianet Film Awards Best New Face of the Year 2015, Femina Miss Kerala 2012-13 हे अॅवॉर्डही मिळविले आहेत.
‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०१९ ला संपूर्ण महाराष्ट्रातल्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.