News Flash

पाहुणे असंख्य पोसते मराठी

चित्रपटच नाही तर कोणत्याही कलेला टिकून राहण्यासाठी त्याच्या आर्थिक बाजू घट्ट असाव्या लागतात.

(संग्रहित छायाचित्र)

मराठी चित्रपटांचा आशय उंचावत चालला आहे, नवनवीन विषयांना हात घातले जातात, एकूणच दर्जा वधारला अशी चर्चा हल्ली आहे खरी पण वास्तवात मात्र या चर्चेचे गल्लय़ात रूपांतर होताना दिसत नाही. चित्रपटांचे स्वरूप बदलले हे खरे आहे तर मग घोडं अडतेय कुठे याचा विचार व्हायला हवा. महाराष्ट्रात हिंदी- इंग्रजी चित्रपटांना प्रेक्षकांचा ऊत येतो, करोडोंचा गल्ला होतो मग हेच मराठी प्रेक्षक आपल्याच चित्रपटांकडे पाठ का फिरवतात, असा गंभीर प्रश्न आज निर्माण झाला आहे. थोडक्यात काय तर ‘पाहुणे असंख्य पोसते मराठी’ अशी सुरेश भटांच्या उक्तीप्रमाणे मराठी प्रेक्षकवर्गाची अवस्था झाली आहे, अशी भावना ‘मन फकिरा’च्या निमित्ताने ‘लोकसत्ता’ कार्यालयात आलेल्या या चित्रपटातील कलाकारांनी व्यक्त केली.

याच विषयावर बोलताना अभिनेत्री- दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे आणि सुव्रत जोशी यांनी आपली मतं मांडली. ‘मन फकिरा’ या चित्रपटाच्या निमित्ताने बोलताना ते म्हणाले, प्रेक्षकांसाठी काय नवीन द्यायचं याचा विचार प्रत्येकच कलाकार करतो आहे पण जर प्रेक्षकच मराठीकडे पाठ फिरवत असतील तर मात्र मराठी कलाकारही नाइलाजाने अन्य भाषांकडे वळतील. आज मराठी कलाकार हिंदीकडे वळले आहेत त्याच पार्श्वभूमीवर हा संवाद झाला. मराठी प्रेक्षक मराठी चित्रपट पाहण्यासाठी थिएटरकडे येणं बंद झालं की मराठी कलाकारही नाइलाजाने अन्य भाषांकडे वळतील. अगदी इच्छा नसतानाही त्यांना वळावं लागेल. कारण हिंदीच नव्हे तर इंग्रजी सिनेमेही आपलेच प्रेक्षक चालवतात. ‘जोकर’, ‘अ‍ॅव्हेंजर’सारखे सिनेमे पाहायची कमालीची उत्सुकता आपल्याकडे पाहायला मिळते. पण मराठीत मात्र असा प्रयत्न केला तरी लोक त्याला स्वीकारतील का असा प्रश्न आहे, असे मृण्मयी म्हणाली.

तर सुव्रतच्या मते, चित्रपटच नाही तर कोणत्याही कलेला टिकून राहण्यासाठी त्याच्या आर्थिक बाजू घट्ट असाव्या लागतात. कारण ती कला टिकवणारा कलाकार जगायला हवा. चित्रपटांमधून बक्कळ पैसे मिळावेत, असं मी कधीच म्हणणार नाही, पण ज्या निर्मात्याने चित्रपटासाठी त्याची संपूर्ण पुंजी लावली आहे. निदान ती तरी त्याला परत मिळावी. पाच वर्षांपूर्वी एखाद्या कलाकाराला १ रुपया बिदागी असेल तर निदान पाच वर्षांनंतर वाढणारी महागाई आणि बदललेल्या आर्थिक समीकरणांनुसार त्याच्या मानधनातही वाढ व्हावी. कलेतून कलाकाराचा उदरनिर्वाहच होत नसेल तर मात्र परिस्थती गंभीर आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी घरातून बाहेर पडून चित्रपटाला येणं गरजेचं आहे, असं तो म्हणतो.

अनेकदा आम्ही हिंदीतून आलेल्या संधीही नाकारतो, कारण आमचा मराठी प्रेक्षकवर्ग आमच्यावर भरभरून प्रेम करतो या एका आशेवर. जर आम्ही भाषेसाठी आमच्या आर्थिक उन्नतीवर पाणी टाकत असू तर प्रेक्षकांनाही याची जाणीव असायला हवी. आणि त्यांनीच पाठ फिरवली तर हे सगळं कुणासाठी करायचं?, असा प्रश्न निर्माण होतो. साहित्याप्रमाणेच चित्रपट हे देखील भाषा जिवंत ठेवण्याचे माध्यम आहे. याचा दाखला आपल्याला दक्षिणेत मिळतो. तिथला प्रेक्षकवर्ग त्यांच्या चित्रपटांसाठी वेडापिसा आहे. ते दैनंदिन जीवनातही इतर भाषा स्वीकारत नाहीत. मग मराठीत हे का होत नाही, असा सवाल मृण्मयीने केला. आपणच हिंदी-इंग्रजी भाषा चवीने बोलतो. मग भाषा कशी जगेल? असे ती म्हणते.

‘मन फकिरा’ चित्रपटाविषयी..

घोडबंदर रोडच्या वाहतूककोंडीत सुचलेल्या विषयाचा आज सिनेमा झाला, आणि त्यानिमित्ताने मराठीत एक नवीन विषय प्रेक्षकांसमोर आला. प्रत्येकाच्या आयुष्याला असलेला भूतकाळ, कात टाकून नव्याने केलेली सुरुवात आणि पुन्हा आयुष्याच्या एका टप्प्यावर त्या भूतकाळाचं अनवधानाने झालेलं पुनरागमन. असं गुंतागुंतीचं पण तितकंच हल्लीच्या नात्यांवर उघडपणे भाष्य करणारं समीकरण म्हणजे ‘मन फकिरा’. मृण्मयी देशपांडे लिखित, दिग्दर्शित ‘मन फकिरा’ हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येत आहे. अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता सुव्रत जोशी यांच्या धमाल जोडीची कमाल केमिस्ट्री या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तसेच अंजली पाटील आणि अंकित मोहन हे आघाडीचे चेहरेही या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. मृण्मयीने दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट असून घरात वावरणाऱ्या प्रत्येक माणसाला आवडेल अशी संहिता तिने लिहिली आहे. आज लग्नानंतर भूतकाळाविषयी बोललं जात नाही किंवा जाणीवपूर्वक टाळलं जातं. पण अरेंज मॅरेज केलेलं जोडपं जेव्हा आपल्या आपल्या भूतकाळाविषयी बोलू लागतं, तेही लग्नाच्या पहिल्या रात्री. तेव्हा त्या नात्याची बदलणारी समीकरणं काय असतील याचा विचार करणेही कठीण आहे. पण याच विषयाला खुलेपणाने मांडण्याचा प्रयत्न या सिनेमातून करण्यात आला आहे.  या चित्रपटाचा काही भाग लंडनमध्ये चित्रित करण्यात आला आहे. परंतु त्यामागे दडलेलं कारण मात्र चित्रपट पाहतानाच उलगडेल. नव्या नात्यांचा गुंता सोडवणारा हा चित्रपट येत्या ६ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

विज्ञानपट अंधारात

मराठीत नावीन्यपूर्ण विषय हाताळले जात असले तरी विज्ञानावर आधारित चित्रपट मात्र मराठीत येत नाहीत. त्याविषयी सुव्रत सांगतो, सध्या भाडिपासारख्या लोकप्रिय माध्यमावर माझी ‘विमॅन’ नावाची विज्ञानावर आधारित एक सीरिज सुरू  आहे. पण भाडिपासारखं माध्यम असतानाही त्या सीरिजकडे दुर्लक्ष झालेलं आहे. अजूनही शास्त्र समजून घेण्याकडे आपला फारसा कल दिसत नाही. किंबहुना ‘शास्त्र’ आणि त्याचं ‘कलात्मक लेखन’ या शैलीचा मेळ घालणं कठीण असल्याने हे प्रत्येकालाच शक्य होतं असं नाही. त्यामुळे विज्ञान मागे राहतंय. तर मृण्मयी सांगते, आज अनेक मराठी शास्त्रज्ञ आहेत, त्यांची अनेक पुस्तकं आहेत, उद्या कोटय़वधी रुपये घालून आपण चित्रपट बनवूही पण तो चालेल का, मराठी प्रेक्षक विज्ञानपट पाहायला येतील का, या प्रश्नांमुळे ही एकप्रकारची जोखीम आहे. तर यालाच दुजोरा देत सुव्रत त्याचा परदेशातील अनुभव सांगतो. तो म्हणतो, आपण गणपती पाहायला गर्दी करतो तशी परदेशात विज्ञान प्रदर्शन पाहायला गर्दी करतात. आपल्याकडे विज्ञान प्रदर्शनाला किती लोक जातात हे प्रत्येकालाच ठाऊक आहे. त्यामुळे विज्ञान हे इथल्या मनामनात रुजणं ही काळाची गरज आहे.

बदल घडू लागलाय

बदलत्या नात्याविषयी आणि लिव्ह इन सारख्या प्रवाहाविषयी समजात मौन असलं तरी साहित्य-नाटक-चित्रपट अशा माध्यमातून याविषयी भाष्य केलं जात आहे. याविषयी मृण्मयी सांगते, आपल्याकडे एखादा विषय उघडपणे  मांडण्याऐवजी कुजबुज करून मांडण्याची पद्धत आहे. त्यामुळे कुणालाच काही नवीन नाही. फक्त चर्चा मात्र या कानातून त्या कानाकडे मर्यादित आहे. हेच बदलून आता उघडपणे बोलायची हिम्मत करायला हवी. कुणाचेच आईबाबा आज अठराव्या शतकात जगत नाहीत. त्यामुळे बदल हा प्रत्येकात झाला आहे. आणि तो व्हायलाच हवा. काळाच्या पुढचे विषय मांडणं हेच कलेचं काम आहे. हे चित्रपटांनी आवर्जून करायला हवं. फक्त आपल्याकडे हिंदी-इंग्रजीत असे विषय चालतात पण मराठीत आले की आपण नाक मुरडतो. तर सुव्रत सांगतो, संस्कृती रक्षणाचे जोखड कलेने झुगारून द्यायला हवं. कारण संस्कृती रक्षण आणि स्मरणरंजन हे कलेचे शाप आहेत. त्यात आपण अडकलो तर जगाच्या पलीकडचं कधी पाहायला शिकणार. जे घडतंय त्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. नाती बदलत असतील तर त्याचा स्वीकार करा. अर्थात ते दाखवताना उथळ किंवा बेतालपणे दाखवून चालणार नाही. जे आज दुर्दैवाने दाखवलं जात आहे.

शब्दांकन : नीलेश अडसूळ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 3:24 am

Web Title: interview with mann fakira movie team abn 97
Next Stories
1 रणबीरच्या प्रेमात!
2 नाट्यरंग : ‘भूमिकन्या सीता’ शोषितेचं आक्रंदन
3 चित्ररंजन : अस्सल मातीतला चित्रपट
Just Now!
X