बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट देण्याऱ्या अभिनेता इरफान खानने हॉलिवूडमध्येदेखील अनेक मोठ्या चित्रपटांमधून भूमिका साकारल्या आहेत. विदेशी चित्रपटांनी त्यांना जास्तीची प्रसिध्दी मिळवून दिली असली तरी जेथे त्यांचे हृदय आहे, तिथेच त्यांचे घर आहे, असे इरफान खान यांचे मानणे आहे. माझी माणसं आणि कथा इथेच आहेत. आज छोटे आणि अपारंपरिक भारतीय चित्रपटांची व्याख्या बदलत आहेत. या निर्भीड दुनियेचा हिस्सा होऊन मी खूश आहे. हॉलिवूड केवळ बोनस असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘मदारी’ चित्रपटात उत्कृष्ट अभिनय सादर करणारे इरफान आगामी हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये हॉलिवूडचे प्रसिध्द अभिनेते टॉम हँक्ससोबत अभिनय करताना दिसणार आहे.

‘पान सिंग तोमर’ (२०१२), ‘द लंचबॉक्स’ (२०१३) आणि ‘पिकू’ (२०१५) सारख्या अनेक हिट चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले आहे. हॉलिवूडमधून त्यांना अनेक चित्रपटांसाठी विचारणा होत असली तरी ते फार मोजक्याच चित्रपटांमधून भूमिका साकारतात. याविषयी बोलताना ते म्हणाले, मला अनेक चांगल्या ऑफर्स मिळतात. जर मी तरुण असतो, तर मी दुसऱ्या देशात स्थायिक होण्याचा विचार केला असता. परंतु, भारत सोडण्याची गरज मला कधीच भासली नाही.

‘लाइफ इन अ मेट्रो’ या त्यांच्या २००७ सालच्या चित्रपटाचा सिक्वल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनुराग बसू दिग्दर्शित या चित्रपटात मुंबईस्थित नऊ जणांची कथा दर्शविण्यात आली होती. शहरी जीवनाबरोबरच विवाहबाह्य प्रेमसंबंधांमुळे दुखावले जाणे आणि आधुनिक जीवनशैली जगताना करावा लागणारा संघर्ष असे मुद्दे चित्रपटात दर्शविण्यात आले होते. प्रेक्षकांकडून या चित्रपटास चांगला प्रतिसाद मिळाला होता.