बॉलीवूडमध्ये प्रेमप्रकरणाच्या चर्चेनंतर ब्रेकमुळे चर्चेत आलेले रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांनी ‘जग्गा जासूस’च्या चित्रीकरणादरम्यान बराच वेळ एकत्र घालवला. यादरम्यान त्यांनी चित्रपटाचा दिग्दर्शक अनुराग बसू याच्यासह बरीच मजामस्ती केली. यासंबंधी एक बातमी समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वीच अनुराग बसूने रणबीर आणि कतरिनासोबत चित्रपटातील उरलेली दृश्ये चित्रीत करून घेतली. या चित्रपटाशी जोडलेल्या एका व्यक्तिने सांगितले की, चित्रीकरणादरम्यान अनुरागने टीमसोबत बरेच प्रॅन्क केले. यात त्याने दोन-तीन असिस्ट्ंटचे केसदेखील कापले. पण, कोणत्याच असिस्टंटमध्ये इतकी हिम्मत नव्हती की ते अनुरागच्या केसलादेखील हात लावतील. मग काय त्यांनी यावेळी रणबीरची मदत घेतली. रणबीरनेही एका क्षणात लगेच यासाठी होकार दिला. त्याने सोबतीला कतरिनाला घेऊन अनुरागला एका खुर्चीवर बसवले आणि असिस्टंट्सचा बदला घेण्यासाठी त्याचे केस कापण्यास सुरुवात केली. रणबीर भलेही रुपेरी पडद्यावर एक उत्तम कलाकार असेल. पण, तो काही उत्तम हेअर स्टाइलिस्ट नाही. त्याने रणबीरच्या केसांचाही अशी काही हेअर स्टाइल केली की, त्याचे केस विचित्र वाटू लागले. त्यामुळे आता अनुरागला त्याचे केस वाढण्याची वाट पाहण्याव्यतिरीक्त पर्याय उरलेला नाही. जेणेकरून, केस वाढल्यावर तो एक चांगली हेअर स्टाइल करू शकेल.

‘जग्गा जासूस’ चित्रपटात रणबीर कपूर आणि कतरिना कैफ ब्रेकअपनंतर पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसतील. या दोघांचा हा एकत्र तिसरा चित्रपट असेल. याआधी त्यांनी ‘राजनीती’ आणि ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या चित्रपटाव्यतिरीक्त रणबीर कपूर लवकरच संजय दत्तच्या बायोग्राफीमध्ये झळकेल. तर चित्रपटाचे दिग्दर्शन राज कुमार हिराणी करत असून याची निर्मिती संजय दत्त प्रॉडक्शन, विधू विनोद चोप्रा हे संयुक्तपणे करणार आहेत. या चित्रपटासाठी रणबीर बरेच कष्ट करत असून त्याने याकरिता १५ किलो वजन वाढविल्याचेही म्हटले जातेय. तसेच, अभिनेत्री सोनम कपूर या चित्रपटामध्ये दिसणार हे पक्के झाल्यानंतर आता बॉलिवूडची आणखी एक आघाडीची अभिनेत्री संजय दत्त आयुष्यावर आधारित चित्रपटामध्ये रणबीरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय दत्त याच्या आयुष्यावर आधारित चित्रपटामध्ये अनुष्का शर्मा देखील दिसणार आहे. या चित्रपटामध्ये अनुष्का शर्मा पाहुणी कलाकार म्हणून दिसणार असल्याचे समजते. चित्रपटामध्ये अनुष्काची भूमिका छोटी असली तरी ही भूमिका दमदार असल्याची चर्चा सध्या बॉलिवूड वर्तुळात रंगत आहे. या चित्रपटात नक्की ती कोणत्या भूमिकेत दिसणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र संजय दत्तच्या आयुष्यात आलेल्या एखाद्या प्रेमिकेच्या रुपात अनुष्काला दाखविण्यात येऊ शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.