‘रिंगण’ फेम दिग्दर्शक मकरंद माने पुन्हा एक हटके कथा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. आगामी ‘कागर’ या चित्रपटाच्या टीझरची चर्चा सोशल मीडियावर असतानाच या चित्रपटातील पहिलंवहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू आणि शुभांकर तावडे यांची लव्हस्टोरी दाखवणारे ‘लागलीया गोडी तुझी’ हे गाणं सोशल मीडियावर हिट ठरतंय. युट्यूबवर या गाण्याला लक्षावधी व्ह्यूज मिळाले असून १५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
‘लागलीया गोडी तुझी’ हे रोमॅण्टिक गाणं असून यामध्ये रिंकू आणि शुभांकर यांची प्रेमकथा पाहायला मिळते. ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी हे गाणं शब्दबद्ध आणि संगीतबद्ध केलं आहे. तर शशा तिरुपती आणि हर्षवर्धन वावरे यांनी हे गाणं गायलं आहे.
‘सैराट’ चित्रपटानंतर दोन वर्षांनी रिंकू प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘कागर’ या चित्रपटाच्या कथेला राजकीय पार्श्वभूमी देण्यात आली आहे. १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, फेब्रुवारीमध्येच रिंकूची बारावीची परीक्षा असल्याने चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्मात्यांनी निर्णय घेतला. ‘कागर’ ही एक प्रेम कथा आहे जी राजकारणाशी गुंफलेली आहे. ‘सुधीर कोलते’ आणि ‘विकास हांडे’ यांच्या’ उदाहरणार्थ’ या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या 26 एप्रिलला हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 7, 2019 4:03 pm