आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कंगना रणौतने ट्विट करत अजून एक वाद ओढवून घेतला आहे. कंगनाने ट्विट करत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या एका ट्विटवर रिप्लाय देताना तिने ही विधाने केली आहेत. तिच्या या विधानांची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ट्विटरवरुन महाराष्ट्रात राष्ट्रपती लागू होईल का असा सवाल उपस्थित केला. याला उत्तर देत कंगनाने आपली याबाबतीतली मते शेअर केली. हंसल मेहतांच्या प्रश्नाला उत्तर देताना कंगना म्हणते, “खरंतर लागू करायला हवी. हंसल सर तुम्ही लवकरच संघी व्हाल. तुम्ही एक तर्कसंगत विचार करणारी व्यक्ती आहात. माझ्यासारख्या लोकांच्या संगतीमुळे तुमच्याही मनात कमळ फुलेल आणि तुम्हीही भक्त व्हाल. मग आपण एकत्रच सदगुरुंच्या आश्रमात जाऊ किंवा कैलास तीर्थयात्रेला जाऊ.”

ती पुढेही यावर ट्विट करते. यात ती म्हणते, “तुम्हाला माहित आहे का मीही एक लिबरल व्यक्ती आहे. मी तर रविशला मुलाखतही दिली आहे. पण मला फार टॅलेंटेड असल्याने क्रुरपणाची वागणूक दिली गेली. मला जेलमध्ये टाकण्याचाही प्रयत्न झाला, मला वेडं ठरवण्यात आलं, त्याच काळात मला भारत सरकारकडून एका मोहिमेसाठी देवी लक्ष्मीची भूमिका साकारण्यासाठीची ऑफर आली. जेव्हा शिवसेनेने मला धमकावलं, तेव्हा त्यांनीच मला संरक्षण दिलं. ते खऱ्या अर्थाने स्त्रीवादी, मुक्त विचारांचे आणि लिबरल तत्वांचे पुरस्कर्ते आहेत. पुढे मागे तुम्हालाही अनुभव येईल. मी माझं आयुष्य कमळाला समर्पित केलं आहे. आणि मला कोणामुळे काहीही फरक पडत नाही.”

कंगनाच्या या उत्तरांनंतर हंसल यांनी कंगनाला करोनाचा कहर कमी झाल्यानंतर आपल्यासोबत कॉफी पिण्यासाठी विचारणा केली आहे.

काही दिवसांपूर्वीच तुमच्यामते भारतीय सिनेमातली सध्याची सर्वोत्तम अभिनेत्री कोण अशी विचारणा केली असता हंसल यांनी कंगनाचा फोटो शेअर केला होता. यावर कंगनाने उत्तर दिलं होतं, “मला माहित आहे प्रेम तर करत आहात, मग लपवता कशासाठी हे मला कळत नाही.”

कंगनाचा ‘थलायवी’ हा बहुचर्चित चित्रपट येत्या २३ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. यात ती भारतीय राजकारणी जयललिता यांची भूमिका साकारणार आहे.