बॉलिवूडची ‘क्वीन’ अर्थात अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच तिच्या वक्तव्यांसाठी चर्चेत असते. आधी घराणेशाही मुद्द्यावरून आणि त्यानंतर हृतिक रोशनवर केलेल्या आरोपांमुळे ती चर्चेत होती. एकीकडे संपूर्ण बॉलिवूडकडून संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटाचे समर्थन होत असताना कंगनाने मात्र वेगळाच मार्ग निवडला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असलेल्या अभिनेत्री दीपिका पदुकोणला साथ देण्यास तिने साफ नकार दिला आहे.

चित्रपटाला राजपूत संघटनांचा तीव्र विरोध होत असून दीपिका आणि भन्साळी यांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर दोघांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली. धमक्यांच्या निषेधार्थ ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी ‘दीपिका बचाओ’ ही मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत दीपिकाच्या सुरक्षेसाठीच्या याचिकेत अनेक अभिनेत्रींची स्वाक्षरी घेण्यात आली.

वाचा : कास्टिंग काऊचबद्दल सलमान म्हणतो..

हेमा मालिनी, जया बच्चन, करीना कपूर खान, आलिया भट्ट, विद्या बालन, अनुष्का शर्मा, प्रियांचा चोप्रा, परिणीती चोप्रा, सोनाक्षी सिन्हा यांसारख्या अभिनेत्रींनी आझमींच्या मोहिमेत सहभाग घेतला. ती याचिका पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठवण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कंगनाने मात्र त्या याचिकेत स्वाक्षरी करण्यास, दीपिकाला साथ देण्यास स्पष्ट नकार दिला.

वाचा : ‘ये है मोहब्बते’मधून दिव्यांकाची एक्झिट?

कंगनाच्या मते जेव्हा ती हृतिक आणि आदित्य पांचोली यांच्यावर आरोप करत होती, तेव्हा बॉलिवूड कलाकार मात्र गप्प होते. त्यावेळी कंगनाच्या मदतीला कोणी धावून आले नाही. म्हणूनच तिने आता ‘पद्मावती’ या चित्रपटाचे समर्थन करण्यास नकार दिला असे म्हटले जात आहे.