बॉलिवूडची पंगा गर्ल अभिनेत्री कंगना रणौतवर ट्विटवरने कारवाई केलीय. वारंवार नियमांचे उल्लंघन करत असल्याचं कारण देत ट्विटरने कंगनाचं ट्विटर अकाऊंट कायमचं बंद केलंय. यानंतर कंगना चांगलीच चर्चेत आलीय. कंगनावर ट्विटरने कारवाई केल्यानंतर दोन डिझायनर्सने कंगनाला बॉयकॉट केलंय. या डिझायनर्सनी कंगनासोबतचे करार मोडले असून तिच्याशी संबंधित जुन्या पोस्ट डिलीट केल्या आहेत. यानंतर कंगनाची बहिण रंगोलीने मात्र संताप व्यक्त केलाय.

यात प्रसिद्ध डिझायनर आनंद भूषण आणि रिमझिम दादू यांनी कंगनासोबतचे करार मोडले आहेत. आनंद यांनी एक स्टेटमेंट जारी करत कंगनासोबतचे करार मोडल्याचं स्पष्ट केलंय. आनंद भूषण यांनी एक ट्विट शेअर करत ही माहिती दिलीय. ते म्हणाले, ” आज जे काही घडलं त्यानंतर आम्ही असा निर्णय घेतोय की कंगनाशी संबंधित सोशल मीडियावरील सर्व पोस्ट आम्ही डिलीट करत आहोत. यासोबतच आम्ही असा निर्णय घेतला आहे की येत्या काळातही आम्ही कंगनासोबत कोणत्याही प्रकारचा करार करणार नाही. एक ब्रॅण्ड म्हणून आम्ही अशा प्रकारच्या द्वेषयुक्त भाषणांना कधीही पाठिंबा देणार नाही.” अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलंय.

तर डिझायनर रिमझिम दादू यांनी देखील कंगनासोबतचे करार रद्द केले आहेत. सोशल मीडियावरून त्यांनी ही माहिती दिलीय. “योग्य गोष्टी कधीही केल्या तरी त्याला उशीर झालाय असं म्हणता येणार नाही. सोशल मीडियावररील कंगनाशी संबंधित आम्ही सर्व पोस्ट आणि करार रद्द करत आहोत. भविष्यात आम्ही तिच्यासोबत काम करणार नाही.” अशी थेट पोस्ट रिमझिमने केलीय. अभिनेत्री स्वरा भास्करने या पोस्ट शेअर करत दोघांच्या निर्णयाचं कौतुक केलंय.

रंगोली घेणार कोर्टात धाव

दोन्ही डियायनर्सच्या या निर्णयानंतर कंगनाची बहिण रंगोली चंदेल हिने संतप्त प्रितिक्रिया व्यक्त केलीय. रंगोलीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर केलीय. यात ती म्हणाली, ” तुला कोण ओळखत आनंद भूषण. कृपा करून जरा शांत बस उगाच प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न नको करू.” एका दुसऱ्या पोस्टमध्ये ती म्हणालीय, ” ही व्यक्ती आनंद भूषण कंगनाच्या नावाखाली प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करतेय. आमचा यांच्याशी कोणताही संबध नाही. आम्ही यांना ओळखतही नाही. अनेकजण त्यांना टॅग करत कंगनाचं नाव उगीच त्यात सामील करत आहेत. अनेक मोठ्या ब्रॅण्डसाठी करोडो रुपये घेते. मात्र बऱ्याचदा एखाद्या मासिकाच्या शूटसाठी त्या कपड्याची निवड हे प्रकाशक करत असतात.” असं रंगोली म्हणाली.

(photo-instagram@rangoli-r-chandel)

पुढे रंगोली म्हणाली, ” स्वत:ला प्रमोट करण्यासाठी हे छोटे डिझायनर कंगनाच्या नावाचा वापर करत आहेत. मी ठरवलंय यांच्याविरोधत कायदेशीर कारवाई करण्याचं. मला सिद्ध करायचंय आमचे यांच्यसोबत कसले करार होते. कोर्टात भेटूयात आनंद भूषण” असं म्हणत कंगनाची बहिण रंगोलीने थेट कायदेशीर कारवाईचा इशारा दिलाय.