बॉलिवूड ड्रग्स प्रकरणी दिग्दर्शक, निर्माता करण जोहर याने अंमली पदार्थ विरोधी पथकाने पाठवलेल्या नोटीशीला उत्तर दिलं आहे. काही दिवसापूर्वीच एनसीबीने करणला चौकशीचे समन्स बजावले होते. २०१९ मध्ये करणच्या घरी एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीतला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये कलाविश्वातील अनेक दिग्गज दिसून येत होते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर या पार्टीत अंमली पदार्थांचं सेवन करण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. त्यामुळे करणला या व्हिडीओविषयी एनसीबीने काही प्रश्न विचारले. मात्र, ज्या फोनमध्ये तो व्हिडीओ होता तो मोबाईल हरवल्याचं स्पष्टीकरण करणने दिलं आहे.

२०१९ मध्ये करण जोहरने त्याच्या घरी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या पार्टीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ‘करणच्या पार्टीत कलाकारांनी ड्रग्सचं सेवन केलं होतं’, असा आरोप शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनी केले होते. त्यामुळे नुकत्याच झालेल्या एनसीबी चौकशीमध्ये करणला या व्हिडीओविषयी विचारणा करण्यात आली. मात्र, “ज्या फोनमध्ये तो व्हिडीओ काढण्यात आला होता. तो मोबाईल हरवला आहे”, असं उत्तर करणने दिलं. त्यासोबतच “माझ्या पार्टीत कुठल्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचं सेवन केलं गेलं नाही” असं तो म्हणाला.

कोण होतं करणच्या पार्टीत?

करणने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये मलायका अरोरा, रणबीर कपूर, विक्की कौशल, वरुण धवन, शकून बत्रा, जोया अख्तर, अर्जुन कपूर, अयान मुखर्जी, दीपिका पदुकोण आणि कार्तिक आर्यन सारख्या कलाकारांचा सहभाग होता. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं होतं. त्यानंतर कलाविश्वातील अनेक दिग्गजांची चौकशी करण्यात आली आहे.

पाहा : आयडियाची कल्पना! ‘या’ कलाकृती पाहून तुमचंही डोकं जाईल चक्रावून

 या सेलिब्रिटींची झाली चौकशी

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात एनसीबीने आत्तापर्यंत ३० पेक्षा जास्त जणांना अटक केली आहे. तसंच रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, फिरोज नाडियादवाला, भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया, अर्जुन रामपाल यांसारख्या बड्या कलाकारांची चौकशी केली आहे.