अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर सुरू झालेला घराणेशाहीचा वाद अजूनही शमलेला नाही. सोशल मीडियावर स्टारकिड्सवर निशाणा साधत अनेकांना ट्रोल केलं गेलं. यावर आता अभिनेत्री करीना कपूरने तिचं मत मांडलंय. खरी परिस्थिती काय आहे हे समजून घेण्याऐवजी लोक आता फक्त टीका करण्यात व्यस्त आहेत, असं ती म्हणाली.

बरखा दत्तला दिलेल्या मुलाखतीत करीना म्हणाली, “फक्त घराणेशाहीमुळे माझं २१ वर्षांचं करिअर घडलं नसतं. हे शक्यच नाहीये. मी अशा लोकांची एक मोठी यादीच तयार करू शकते जे सुपरस्टारच्या कुटुंबातील आहेत, त्यांची मुलं आहेत तरी त्यांना यश मिळालं नाही. कदाचित तुम्हाला ऐकायला विचित्र वाटेल पण मीसुद्धा संघर्ष केला आहे. पण कदाचित हा संघर्ष इतका रंजक नसेल जितका एखादा व्यक्ती त्याच्या खिशात फक्त १० रुपये घेऊन रेल्वेने इथे आला असेल.”

आणखी वाचा : सुशांतच्या बँक खात्यातून ५० कोटी रुपये काढले गेले, याबाबत मुंबई पोलीस गप्प का?- बिहारचे पोलीस महासंचालक

प्रेक्षकांना सर्वस्वी मानत करीना पुढे म्हणाली, “आम्हाला प्रेक्षकांनी घडवलं आहे, आणखी कोणी नाही. जे लोक आता आमच्याकडे बोट दाखवत आहेत, त्यांनीच आम्हाला स्टार बनवलंय. तुम्ही जाताय ना चित्रपट बघायला? नका जाऊ. कोणी तुमच्यावर जबरदस्ती केली नाही. मला हा संपूर्ण वादच विचित्रपणा वाटतो. प्रेक्षकांनी निवडलेले कलाकारच आता मोठे स्टार आहेत. मग तो अक्षय कुमार असो, शाहरुख खान असो, आयुषमान खुराना किंवा राजकुमार राव असो. हे सर्वजण यशस्वी कलाकार आहेत कारण त्यांनी खूप मेहनत केली आहे. यात आलिया भट्ट असो किंवा करीन कपूर.. आम्हीसुद्धा मेहनत केली आहे. तुम्ही आमचे चित्रपट पाहता आणि त्यांचा आनंदसुद्धा लुटता. त्यामुळे प्रेक्षकच आम्हाला घडवू शकतात.”

१४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचा तपास मुंबई व बिहार पोलीस करत आहेत. पण यादरम्यान सोशल मीडियावर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीचा वादही जोरदार सुरू आहे.