सोनी वाहिनीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ चे ११ वे पर्व सध्या सुरु आहे. यंदाच्या पर्वामध्ये आतापर्यंत चार स्पर्धकांचे करोडपती बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. मात्र याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका महिला स्पर्धकाचे करोडपती होण्याचे स्वप्न दीपिका पदुकोणसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला चुकीचे उत्तर दिल्याने भंगले.

बुधवारी प्रदर्शित झालेल्या कार्यक्रमामध्ये राजस्थानमधील झुंझुनूं येथील प्रेरणा या अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर बसल्या होत्या. काही प्रश्नांची बरोबर उत्तरे दिल्यानंतर सातव्या प्रश्नाला प्रेरणा यांनी ५०-५० ही लाइफलाइन वापरली. कोणता खेळाडू आणि खेळ याचा संबंध नाहीय असा हा प्रश्न होता. या प्रश्नाला ए) लिओन मेस्सी फुटबॉल, बी) उसेन बोल्ट अॅथलेटीक्स, सी) मायकल फेल्प्स गोल्फ आणि डी) रॉजरर फेडरर टेनिस असे पर्याय देण्यात आले होते. प्रेरणा यांनी ५०-५० लाइफलाइन वापरल्यानंतर पर्याय सी आणि डी उरले. त्यानंतर त्यांनी बरोबर उत्तर देत पर्याय सी निवडला.

प्रेरणा यांनी १० व्या म्हणजे ३ लाख २० हजार रुपयांच्या प्रश्नाला आपल्या दोन लाइफलाइन घालवल्या. १८६८ मध्ये शोध लावण्यात आलेल्या हेलियमचे कोणत्या नैसर्गिक गोष्टीवर नामकरण करण्यात आले होते. या प्रश्नाला पर्याय होते ए) पाऊस, बी) वारा, सी) ढग आणि डी) सुर्य असे पर्याय देण्यात आले होते. या प्रश्नाला प्रेरणा यांनी ‘प्रश्न बदला’ म्हणजेच ‘फ्लिप द क्वेश्चन’ हा पर्याय वापरला. अमिताभ यांनी विचारलेल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर डी सूर्य असल्याचे सांगत प्रश्न बदलला. बदललेला प्रश्न रामायणासंदर्भात होता. रामायणानुसार भगवान रामाला मदत करण्यास तयार होण्यासाठी त्याच्या धनुर्विद्येची परिक्षा कोणी घेतली होती?, असा नवा प्रश्न प्रेरणा यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला ए) विभीषण, बी) कबांगा, सी) सुग्रीव आणि ड़ी) हनुमान असे पर्याय देण्यात आले होते. या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी प्रेरणा यांनी तज्ज्ञांना विचारा ही म्हणजेच आस्क एक्सपर्ट ही लाइफलाइन वापरली. प्रसिद्ध लेखिका अर्चना गरोडीया यांनी या प्रश्नाचे बरोबर उत्तर सी सुग्रीव असल्याचे सांगितले. अर्चना यांच्या मदतीने प्रेरणा यांनी दुसरा टप्पा पार करत ३ लाख २० हजार रुपये जिंकले.

प्रेरणा यांना ६ लाख ४० हजारांसाठी ११ वा प्रश्न विचारण्यात आला तो मनोरंजन श्रेत्राशी संबंधित होता. ‘ऐश्वर्या या चित्रपटामधून कोणत्या अभिनेत्रिने पदार्पण केले?,’ असा हा प्रश्न होता. या प्रश्नासाठी ए) ऐश्वर्या राय, बी) दीपिका पदुकोण, सी) प्रियांका चोप्रा आणि डी) सोनम कपूर असे पर्याय देण्यात आले होते. प्रेरणा यांनी या प्रश्नाल डी सोनम कपूर असे उत्तर दिले आणि त्यांचे उत्तर चुकले. त्यामुळे त्यांना ३ लाख २० हजार रुपये घेऊन खेळ सोडावा लागला. या प्रश्नाचे बरोबर उत्तर होते बी दीपिका पादुकोण. ही पाहा त्या चित्रपटाची झलक…

अनेकांना ठाऊक नसेल पण दीपिकाने मोठ्या पडद्यावर पदार्पण २००६ साली ऐश्वर्या या कानडी चित्रपटामधून केले होते. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानबरोबर दीपिकाने काम केलेला २००७ साली प्रदर्शित झालेला ओम शांती ओम हा तिच्या कारकिर्दीमधील दुसरा आणि हिंदीमधील पहिली चित्रपट होता.