इंद्र कुमार यांचा बहुप्रतिक्षित ठरत असलेला ‘टोटल धमाल’ हा चित्रपट येत्या २२ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘धमाल फ्रेंचाइजी’मधील हा तिसरा चित्रपट आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये तगडीस्टार कास्ट झळकल्यामुळे या चित्रपटाविषयीची प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विशेष म्हणजे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तो लोकप्रिय ठरत आहे. याव्यतिरिक्त अशी काही कारणं आहेत, ज्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणार असल्याचं दिसून येत आहे.

१. अजय देवगण
गोलमाल सिरीजमधील अजयचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. या चित्रपटामध्ये लहान लहान कोट्या करुन अजयने प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. त्यातच ‘टोटल धमाल’ हा चित्रपटदेखील प्रेक्षकांना खळखळून हसविणार असून अजय पुन्हा एकदा त्याच्या विनोदांनी प्रेक्षकांचं मन जिंकेल यात शंका नाही. त्यामुळे अजयचं या चित्रपटात असणं फायद्याचं ठरणार आहे.

२. तगडी स्टारकास्ट –
२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या धमालमध्ये चार मित्रांची (आशिष चौधरी, रितेश देशमुख, जावेद जाफरी, अर्शद वारसी) कथा सांगण्यात आली होती. मात्र या तिसऱ्या सीरिजमध्ये मोठ्या प्रमाणावर कलाकारांचा समावेश करण्यात आला आहे. माधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूर, अर्शद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफ्री, जॉनी लिव्हर, बोमन ईरानी, संजय मिश्रा, अली असगर, महेश मांजरेकर,ईशा गुप्ता अशी मोठी स्टारकास्ट या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.

३. अनिल कपूर-माधुरी दीक्षित –
९० च्या दशकावर प्रत्येक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी जोडी म्हणजे अनिल कपूर-माधुरी दीक्षित. या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल १७ वर्षानंतर अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे या जोडीला पुन्हा एकदा पाहण्यासाठी चाहते नक्कीच चित्रपटगृहात गर्दी करतील.

४. अॅडव्हेंचर कॉमेडी –
टोटल धमाल हा अॅडव्हेंचर कॉमेडी चित्रपट असून प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये याचा प्रत्यय आला. ५० कोटी रुपयांचे गुप्त धन आणि ते मिळविण्यासाठी संपूर्ण टीमने केलेले कारनामे या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. पैशांसाठी जनकपूरपर्यंतचा प्रवास करताना या टीमला येणाऱ्या अडचणी अत्यंत सुंदर आणि विनोदीरित्या मांडण्यात आल्या आहेत.

५. नवीन वर्षातला पहिलाच विनोदीपट –
२०१९ या वर्षाच्या सुरुवातील बायोपिक किंवा राजकीय व्यक्तीमत्वांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर नवीन वर्षाच्या दुसऱ्याच महिन्यामध्ये हा कॉमेडी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी हास्याची मेजवानी ठरणार आहे.