बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत असणारा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट ‘कंचना’ या तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राघव लॉरेंसने केले आहे. पण हिंदी रिमेकसाठी चित्रपटाचे नाव का बदलण्यात आले याबाबत दिग्दर्शक राघव लॉरेंसने खुलासा केला आहे.

नुकताच राघवने एका मुलाखतीमध्ये हिंदी रिमेक करताना ‘कंचना’ चित्रपटाचे नाव बदलून ‘लक्ष्मी बॉम्ब’ का ठेवले हे सांगितले आहे. ‘आमच्या तामिळ चित्रपटातील मुख्य पात्र कंचनावरुन चित्रपटाचे नाव ठेवण्यात आले होते. कंचनाचा अर्थ म्हणजे सोने, जे लक्ष्मीचे प्रतिक आहे. सुरुवातीला आम्ही हिंदी रिमेकचे नाव कंचनाच ठेवण्याचे ठरवले होते. पण नंतर सर्वांनी मिळून ते बदलण्याचा निर्णय घेतला. आम्ही सर्वांनी लक्ष्मी ठेवण्याचा निर्णय घेतला’ असे राघव म्हणाला.

आणखी वाचा : अक्षयच्या बहुप्रतिक्षित ‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर प्रदर्शित

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ‘कंचना ’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. राघवा लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल १२५ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले जात आहे. येत्या दिवाळीमध्ये लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या दिवशी हा चित्रपट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूएई या देशातही प्रदर्शित करण्यात येणार आहे.