नाटक आपले आयुष्य समृद्ध करते. रोज काम करायचे, पण मोठ्ठं व्हायचं नाही. सतत शिकत रहा, वाचन करा. त्यातून रंगमंचावरील नाटक अधिक प्रगल्भ होत राहील, असे प्रतिपादन नाटय़ कलावंत मकरंद अनासपुरे यांनी ठाणे येथे केले.
ज्येष्ठ रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून जन्माला आलेल्या ‘वंचितांचा रंगमंच’ हा कार्यक्रम नुकताच ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे संपन्न झाला. समता विचार प्रसारक संस्थेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ठाण्यातील गरीब वस्तीतील मुलांना एकत्र आणत त्यांना अभिनयाचे धडे देण्यात आले. ठाण्यातील गरीब वस्तीत राहणाऱ्या लाहनग्या मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी मतकरी यांनी या कार्यक्रमाची आखणी केली होती. या वेळी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत राहूनही या मुलांनी स्वत:च्या जीवनातील विविध अडचणींमधून आलेल्या अनुभवांचे वास्तवदर्शी असे सादरीकरण केले.   
या वेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना मकरंद अनासपुरे यांनी नाटकाचे महत्त्व अधोरेखित केले. सगळ्याच क्षेत्रांमध्ये अडचणी असतात. कलेच्या किंवा कोणत्याही क्षेत्रात यशाला शॉर्टकट नसतो. त्यामुळे मेहनतीशिवाय पर्याय नाही, असा सल्ला या वेळी अनासपुरे यांनी दिला. सतत शिकत राहणे, भरपूर वाचत राहा असा सल्ला देतानाच नाटकातून आपल्या आसपासच्या गोष्टींचे सादरीकरण करा, असे आवाहनही अनासपुरे यांनी या वेळी केले. या अशा प्रयोगातून मुलांच्या जाणिवा विकसित होतात, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमास महापौर संजय मोरे, परीक्षक व अभिनेते उदय सबनीस, दिग्दर्शक विजू माने, सुप्रिया विनोद यांची उपस्थिती लाभली. समता विचार प्रसारक व मतकरी यांनी हा प्रयोग फक्त ठाण्यासाठी मर्यादित न ठेवता देशभर करावा, असे आवाहन या वेळी उपस्थितांनी केले. या मुलांनी केलेल्या सादरीकरणाने आपण भारावून गेलो असून येत्या वर्षांत या धर्तीवर एखादी एकांकिका स्पर्धा भरविण्याचे आश्वासन महापौर संजय मोरे यांनी या वेळी दिले. या स्पर्धेत उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्तम अभिनयासाठी वेगवेगळी पारितोषिके प्रदान करण्यात आली. वागळे इस्टेट परिसरातील मुलांनी सादर केलेल्या ‘तणाव’ या मूक अभिनयाला प्रथम तर घणसोली येथील मुलांनी सादर केलेल्या ‘देव तारी त्याला कोण मारी’ या नाटकाला द्वितीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. येऊर येथील पाटणपाडय़ातील मुलांच्या ‘डोंगरापलीकडील प्रश्न’ या नाटकास तृतीय पारितोषिक देण्यात आले.