‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’चे सादरीकरण आणि निर्मिती असलेला ‘आम्ही दोघी’हा चित्रपट येत्या २३ फेब्रुवारी २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह परदेशातही प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री, वेशभूषाकार आणि सह-दिग्दर्शक प्रतिमा जोशी यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शिका म्हणून पदार्पण केले असून पटकथा प्रतिमा जोशी आणि भाग्यश्री जाधव यांची तर संवाद भाग्यश्री जाधव यांचे आहेत. रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या अभिनेत्री प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट लेखिका गौरी देशपांडे यांच्या एका कथेवर आधारित आहे. चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शिका प्रतिमा जोशी, प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे यांच्याशी साधलेला संवाद..

नुकताच प्रदर्शित झालेला ‘आपला मानूस’ आणि लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘आम्ही दोघी’ या चित्रपटात साम्य काय असे विचारले तर हे दोन्ही चित्रपट मराठी साहित्यकृतीवर आधारित आहेत, असे सांगता येईल. ‘आपला मानूस’ हा चित्रपट विवेक बेळे  यांच्या ‘काटकोन त्रिकोण’ नाटकावर तर ‘आम्ही दोघी’ चित्रपट लेखिका गौरी देशपांडे यांच्या एका कथेवर आधारित आहे. दूरचित्रवाहिन्यांवर या आधीही मराठी साहित्यातील कथा, कादंबरी, नाटक आदी विविध साहित्यकृतींवर आधारित मालिका मोठय़ा प्रमाणात सादर झाल्या. तर आता गेल्या काही वर्षांत मराठी साहित्यकृतींवर आधारित मराठी चित्रपटांची संख्याही वाढते आहे. भा. रा. भागवत यांच्या ‘फास्टर फेणे’वर आधारित याच नावाचा चित्रपट हे अगदी अलीकडचे उदाहरण. या निमित्ताने दर्जेदार साहित्यकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास आणि त्या लेखकाचे अन्य साहित्य वाचण्यास प्रेक्षकांना प्रवृत्त करण्यासाठी याची थोडीफार मदतच होते आहे.  लेखिका गौरी देशपांडे या काळाच्या पुढे विचार करणाऱ्या लेखिका. त्यांच्या कथा, कादंबऱ्या आणि त्यातील व्यक्तिरेखा या आजच्या काळातही सुसंगत आहेत. गौरी देशपांडे यांचे लेखन म्हणजे एकप्रकारे द्रष्टेपणच म्हणता येईल. हा चित्रपटही गौरी देशपांडे यांच्या एका कथेवरच आधारित आहे. आजच्या वर्तमानातील तरुणी किंवा गृहिणी या दोघींनाही ही गोष्ट आपली वाटेल अशीच आहे. ‘आम्ही दोघी’ चित्रपटाची कथा ‘अमला’ आणि ‘सावित्री’ या दोन प्रमुख स्त्री पात्रांवरील आहे. या दोन्ही भूमिका अनुक्रमे मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट यांनी साकारल्या आहेत. जे मनात येईल ते पटकन करून मोकळे व्हा, नाहीतर पश्चात्ताप करण्याची वेळ येईल,’ असे सावित्रीच्या जीवनाचे तत्त्वज्ञान. तर ‘अमला’ ही अत्यंत शांत, संयमी स्वभावाची. या दोघींची विचारसरणी वेगळी असली आणि त्यांचे अंतिम ध्येय एकच असले तरी त्या मार्ग मात्र वेगवेगळे चोखाळतात.

नातेसंबंधांवर आधारित कथा

चित्रपटाचे दिग्दर्शन प्रतिमा जोशी यांनी केले आहे. ज्येष्ठ नाटय़ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या काही चित्रपटांसाठी त्यांनी सहदिग्दर्शक म्हणून चंद्रकांत यांच्यासमवेत काम केले आहे. वेशभूषाकार आणि अभिनेत्री अशीही त्यांची ओळख आहे. स्वतंत्रपणे दिग्दर्शन असलेला हा त्यांचा पहिलाच चित्रपट. ‘रविवार वृत्तान्त’शी बोलताना त्या म्हणाल्या, गौरी देशपांडे या माझ्या आवडत्या लेखिका. त्यांच्या ‘एकेक पान गळावया’ने माझ्या मनावर गारूड केले होते. महाविद्यालयीन जीवनात गौरी देशपांडे यांचे अन्य साहित्यही वाचले होते. स्वतंत्रपणे जेव्हा कधी दिग्दर्शन करेन तेव्हा माझा पहिला चित्रपट गौरी देशपांडे यांच्या कथेवर आधारितच असेल, असे ठरविले होते आणि ‘आम्ही दोघी’च्या निमित्ताने ती इच्छा पूर्ण होत आहे. हा चित्रपट गौरी देशपांडे यांच्या ज्या कथेवर आधारित आहे ती कथा सुमारे बारा पानांची आहे. पडद्यावर चित्रपट सादर करण्यासाठी ते पुरेसे नव्हते. त्यामुळे गौरी देशपांडे यांच्याजवळच्या मैत्रिणी विद्या बाळ आणि विद्युत भागवत यांच्याशी गौरी देशपांडे यांच्याविषयी आणि त्यांच्या साहित्यकृतींविषयी चर्चा केली. गौरी देशपांडे यांचे साहित्य पुन्हा एकदा वाचून काढले. वर्षभर त्यावर काम केले आणि यातून ‘आम्ही दोघी’ साकारला.

चित्रपटातील ‘सावित्री’ आणि ‘अमला’ भूमिकांसाठी प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे यांची कशी निवड केली?, या प्रश्नावर जोशी यांनी सांगितले, ही कथा जेव्हा वाचली तेव्हाच ‘सावित्री’ आणि ‘अमला’ या भूमिकांसाठी दिग्दर्शिका म्हणून प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे या दोघींचीच नावे डोळ्यासमोर आली. दोन्ही भूमिकांचे पैलू, कंगोरे यांना त्या योग्य न्याय देतील याची खात्री होती. त्यामुळे साहजिकच या दोघींची निवड केली. ‘सावित्री’ या भूमिकेचा आलेख १६ ते ३० वर्षे असा आहे. नातेसंबंध हा विषय कोणत्याही काळात प्रत्येकाच्या मनाला भिडतोच भिडतो. ‘सावित्री’ आणि ‘अमला’ या दोघीही एकदम वेगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या असल्या तरी स्त्रीत्व हा त्यांच्यातील एक समान धागा असून त्यांच्या नातेसंबंधाची ही कथा आहे. आजच्या काळातील तरुणींना आणि गृहिणींनाही ही कथा आपली वाटेल.

वर्तमानाशी निगडित

‘आम्ही दोघी’ चित्रपटात मी ‘सावित्री’ ही भूमिका साकारत असून हा चित्रपट वर्तमानाशी निगडित आहे. त्यामुळे  म्हटले तर हा आजच्या पिढीचा चित्रपट आहे. ‘आम्ही दोघी’ असे नाव असले तरी हा चित्रपट केवळ स्त्रीप्रधान नाही. मुलगी आणि वडील, पत्नी आणि पती, मुलगी आणि तिच्या मैत्रिणी अशी एकूणच वेगवेगळी नाती आणि त्यांचे परस्परसंबंध चित्रपटातून उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाची कथा चाळीस वर्षांपूर्वी लिहिली गेली असली तरी ती आजच्या काळाशी निगडित आहे. ‘सावित्री’ ही फटकळ, परखड मत व्यक्त करणारी आणि व्यावहारिक विचार करणारी आहे. भावनेत न गुंतणारी तरीही कमालीची खरी असणारी आहे. ही भूमिका साकारण्यासाठी आम्हाला जी संहिता दिली गेली त्यावरूनच भूमिकेचा अभ्यास केला आणि ‘सावित्री’ उलगडत गेली.  हा चित्रपट पाहून आयुष्य जगण्याचा एक वेगळा अनुभव नक्कीच मिळेल   – प्रिया बापट

भावनांचे नाटय़

दोन व्यक्तींमधील भावनांचे नाटय़ असे या चित्रपटाचे स्वरूप आहे. गौरी देशपांडे यांची ही कथा आणि एकूणच साहित्य मुळातच काळाच्या पुढे जाणारे आणि विचार करणारे आहे. हा चित्रपट म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या जगण्याची गोष्ट आहे. यातील भूमिकांमध्ये, प्रसंगात प्रत्येकाला स्वत:ला पाहायला नक्कीच आवडेल. आजची तरुण पिढी या चित्रपटाशी नक्कीच निगडित होईल.  मी‘अमला’ची भूमिका करीत आहे. अत्यंत शांत, संयमी, स्वत:विषयी आत्मविश्वास तिला आहे. ज्या वातावरणात ती जाईल तिथे ती मिसळून आणि समरस होऊन जाणारी आहे. भूमिकेसाठी वेगळा काही अभ्यास केला नाही. संहिता परिपूर्ण होतीच. अलीकडे दूरचित्रवाहिनी किंवा नाटकातून मी ज्या शैलीच्या भूमिका साकारते आहे, त्यापेक्षा ‘आम्ही दोघी’मधील ‘सावित्री’ ही वेगळी भूमिका आहे. ही भूमिका साकारताना खूप मजा आली, छान वाटले.  – मुक्ता बर्वे