‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून ओळखला जातो. या शोमध्ये खेळले जाणारे टाक्स, केली जाणारी विधानं, स्पर्धकांचं वर्तन हे कायमच चर्चेचा विषय ठरतं. परंतु यावेळी हा शो चक्क मराठी भाषेमुळे चर्चेत आहे. प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू याला मराठी भाषा आवडत नाही. किंबहूना मराठी ऐकताच माझ्या डोक्यात तिडीक जाते असं तो म्हणाला. त्याच्या या वादग्रस्त वक्तव्यावर दिग्दर्शक, निर्माते महेश टिळेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात राहून तूला मराठीची लाज का वाटते? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

महेश टिळेकर यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जान कुमार सानूवर जोरदार टीका केली आहे. “महाराष्ट्रात राहून या कलाकारांना मराठीची लाज का वाटते? प्रसिद्ध गायक कुमार सानू मुंबईत राहतात, मराठी लोकांनीही त्यांची गाणी ऐकली त्यांना मोठं करण्यात महाराष्ट्राचा वाटा आहेच पण कुमार सानू यांचा हा दिवटा मुलगा जान सानू सध्या बिग बॉस मध्ये सहभागी आहे. तिथं तो त्याच्याशी मराठीत बोलणाऱ्या सहकलाकाराला मराठी बोलू नको म्हणून सांगतोय. मुंबईत राहून याला मराठी भाषेबद्दल इतका राग आहे तर याने महाराष्ट्रात तरी का रहावे?” अशा शब्दात महेश यांनी जान कुमार सानूबाबत संताप व्यक्त केला. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

जान कुमार सानू बिग बॉसच्या १४ व्या सीझनमध्ये सहभागी झाला आहे. दरम्यान अभिनेत्री निक्की तंबोळी त्याच्यासोबत हिंदी ऐवजी मराठी भाषेत संभाषण करत होती. त्यावेळी जान कुमारने तिला मराठी बोलण्यापासून रोखलं शिवाय मराठी भाषेवर टीके देखील केली. मला मराठी भाषा आवडत नाही. माझ्याशी मराठी भाषेमध्ये बोलू नकोस. मराठी ऐकताच माझ्या डोक्यात तिडीक जाते असं म्हणत त्याने निक्की समोर आपला संताप व्यक्त केला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मराठी भाषिक या वक्तव्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका करत आहेत.