अभिनेता सोनू सुद सध्या बराच चर्चेत आहे. सोनूने परराज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पोहचवण्याची ‘घर भेजो’ मोहिम हाती घेतली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २५ मार्चपासून लॉकडाउन सुरु आहे. लॉकडाउन सुरु झाल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक स्थलांतरित मजुरांचे हाल झाले आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकून पडलेल्या मजुरांनी चालत आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतल्याने मागील जवळजवळ दोन महिन्यांपासून देशातील अनेक राज्यांमधून मजूर चालत आपल्या राज्यांमध्ये परत जाताना दिसत आहे. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या लॉकडाउनमध्ये श्रमिक विशेष ट्रेन्सच्या माध्यमातून मजुरांना त्यांच्या राज्यात पोहचवण्याची सुविधा देण्यात आली आहे. असं असलं तरी अनेक श्रमिकांना आपल्या राज्यात जाण्यात अडचणी येत आहेत. यासाठी सोनूने पुढाकार घेतला असून तो मुंबईसहीत देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये अडकलेल्या उत्तरेतील मजुरांना घरी पोहचवण्यासाठी बस गाड्यांची सोय करताना दिसत आहे. सोनूकडे थेट ट्विटवरुन मदतीची मागणी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या लोकांना सोनू थेट ट्विटवरुन मदत करतानाही दिसत आहे. असं असतानाच एका व्यक्तीने सोनूकडे अगदीच आगळीवेगळी मागणी केली आणि त्याला सोनूने तितकचे भन्नाट उत्तर दिलं आहे.
लॉकडाउन सुरु झाल्यापासून बंद असणारी दारुची दुकाने दोन आठवड्यांपूर्वी सुरु करण्यात आली. चौथ्या लॉकडाउनदरम्यान दारुच्या दुकांना परवानगी मिळाल्यानंतर दारुच्या दुकानांसमोर लांबच लांब रांगा दिसल्या. अनेक मद्यप्रेमी सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडून या रांगांमध्ये उभे असल्याचे चित्रही पहायला मिळाले. कामगारांना घरी पोचवण्यासाठी मदत करणाऱ्या अशाच एका मद्यप्रेमीने ट्विटवरुन मद्यप्रेमापोटी थेट सोनूची मदत मागितली. या व्यक्तीने “सोनू भावा मी माझ्या घरात अडकलो आहो. मला ठेक्यापर्यंत (दारुच्या दुकानापर्यंत) पोहचव” असं ट्विट केलं होतं.
सोनू भाइ में अपने घर में
फँसा हुआ हूं ।मुझे ठेके तक पहुंचा दो— bulla bhaai (@bulla_khullaaaa) May 24, 2020
सध्या मजुरांना मदत करण्यामध्ये व्यस्त असलेल्या सोनूनेही या मजेदार ट्विटला तितकाच भन्नाट रिप्लाय दिला आहे. “भावा मी तुला दारुच्या दुकानातून घरी पोहचवू शकतो. गरज लागली तर सांग,” असं उत्तर सोनूने या ट्विटला दिलं आहे. सोनूचे हे ट्विट व्हायरल झालं आहे.
भाई मैं ठेके से घर तक तो पहुँचा सकता हूँ । ज़रूरत पड़े तो बोल देना https://t.co/tneToRoEXn
— sonu sood (@SonuSood) May 24, 2020
कालच परराज्यात अडकलेल्या विनोद कुमार नावाच्या व्यक्तीने सोनूला ट्विटवर टॅग करत “सोनू सर तुमची मदत हवीय. आम्हाला पूर्व उत्तर प्रदेशमधील कोणत्याही ठिकाणी पोहचवण्याची सोय करा तिथून आम्ही पायी चालत आमच्या गावी जाऊ सर,” अशा शब्दात मदत मागितली होती.
@SonuSood help sir please, Esat यूपी में कहीं भी भेज दो सर वहां से पैदल चले जाएंगे अपने गांव सर
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Vinod Kumar (@VinodKumar24489) May 22, 2020
सोनूनेही या व्यक्तीच्या ट्विटची दखल घेतली. मात्र त्याने दिलेला रिप्लाय सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला होता. आम्हाला उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील भागात कुठेही उतरवा अशी मागणी करणाऱ्याला सोनूने, “चालत का जाणार मित्रा? नंबर पाठव तू” असा रिप्लाय दिला होता.
पैदल क्यों जाओगे दोस्त?? नम्बर भेजो। https://t.co/48vflmw4DA
— sonu sood (@SonuSood) May 22, 2020
दहा हजारहून अधिक जणांनी सोनूचे हे ट्विट रिट्विट केलं आहे. अनेकांनी या ट्विटवर प्रतिक्रिया देताना सोनूचं कौतुक केलं आहे. अशाप्रकारे थेट ट्विटवरुन उत्तर देत परराज्यांमध्ये अडकलेल्यांना सोनूने दिलासा देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही याआधीही त्याने अशाप्रकारे काहीजणांना थेट ट्विटवरुन मदत केली आहे. सोनूच्या कामाने प्रभावित होऊन महाराष्ट्र राज्यातील कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन त्याचे कौतुक केलं आहे. पडद्यावर खलनायकाचं काम करणारा, प्रत्यक्ष आयुष्यात हिरोचं काम करत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनाही सोनूचे कौतुक केलं आहे.