गेल्या अनेक वर्षांपासून स्वत: वृक्षारोपणाची जबाबदारी पेलणारे अभिनेते सयाजी शिंदे लवकरच एका पर्यावरणावर आधारित चित्रपटात झळकणार आहेत. हा चित्रपट पर्यावरण अभ्यासक आणि लेखक संतोष शिंत्रे यांच्या कथेवर बेतलेला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ असं या चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी यांनी सांभाळली आहे. तर फटमार फिल्म्स एलएलपी या निर्मिती संस्थेकडून ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ची निर्मिती करण्यात येत आहे.

गिरीश कुलकर्णी आणि सयाजी शिंदे यांची या चित्रपटात मुख्य भूमिका असून आतापर्यंत कधीही न हाताळलेला विषय या चित्रपटातून दिसणार आहे. अनेक मातब्बर कलाकारांचा चित्रपटात समावेश आहे. प्रसाद नामजोशी यांनी चित्रपटाचं पटकथा आणि संवादलेखन केलं आहे.

‘सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांसह काम करायला मिळणं ही आमच्यासाठी मोठी संधी आहे. आतापर्यंत या दोन्ही अभिनेत्यांनी केलेलं काम पाहिलं आहे. त्यामुळे ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’तील भूमिकांसाठी सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी महत्त्वाचे आहेत. त्यांच्या अभिनयाची क्षमता मोठी आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाहीच. पण या निमित्ताने प्रेक्षकांना अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळेल, असं चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी सांगितलं.