सचिन शिंदे निर्मित ‘रॉमकॉम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून या चित्रपटातून पहिल्यांदाच एक नवी जोडी कलाविश्वामध्ये पदार्पण करणार आहे. विजय गिते आणि मधुरा वैद्य या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहेत.
रॉमकॉम या चित्रपटातून राहुल आणि सुमन यांची लव्हस्टोरी उलगडली जाणार आहे. या प्रेमकथेतून एका नात्यातील प्रत्येक पदर हळुवारपणे उलगडण्यात येणार आहे. प्रदर्शित झालेल्या टीझरमधून प्रेम आणि प्रेमात येणाऱ्या अडचणी दाखविण्यात आल्या आहेत.
दरम्यान, ड्रीम लाँचर एंटरटेन्मेंट फिल्म आणि कास्टिंग एजन्सी यांनी ‘रॉमकॉम’ या चित्रपटाची निर्मिती केली असून सचिन शिंदे चित्रपटाचे निर्माते आहेत. तर गोरख जोगदंडे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
विजय गिते याने यापूर्वी ‘स्ट्रगलर्स’, ‘इपितर’, ‘दोस्तीगिरी’ अशा चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत. तर मधुरानं ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत काम केलं होतं. त्यामुळे ‘रॉमकॉम’ हा मधुराचा पदार्पणाचा चित्रपट ठरणार आहे. या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला एक फ्रेश जोडी मिळणार आहे. या कलाकारांसोबतच किशोर कदम, छाया कदम,अंतरा पाटील,श्वेता नाईक,स्वाती पानसरे,फकिरा वाघ,दिलीप वाघ,शोभा दांडगे,सिद्धेश्वरा आणि आसित रेड्डी या कलाकारांच्या भूमिका आपल्याला पहायला मिळणार असून येत्या १८ ऑक्टोबरला हा चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 27, 2019 3:49 pm