06 December 2020

News Flash

।। मेघदूत।। : अप्रतिम दृक्-श्राव्य-काव्य!

पुण्याच्या ‘प्रवेश’ या संस्थेनं नुकताच ‘मेघदूत’ या नृत्यनाटय़ाचा नितांतसुंदर प्रयोग मुंबईत सादर केला.

‘मेघदूत’.. कविश्रेष्ठ कालिदासरचित एक अभिजात खंडकाव्य!

‘मेघदूत’..

कविश्रेष्ठ कालिदासरचित एक अभिजात खंडकाव्य!

साधारणत: गुप्तकाळात इ. स. चौथ्या ते सहाव्या शतकादरम्यान या काव्याची निर्मिती झाली असावी असं मानलं जातं. सुमारे १११ कडव्यांच्या या रचनेचे ‘पूर्वमेघ’ आणि ‘उत्तरमेघ’ असे दोन भाग आहेत. पैकी पूर्वमेघात रामगिरीस्थित विरहव्याकुळ यक्षाने अलकापुरीला जाऊन आपल्या प्रियतमेला आपलं क्षेमकुशल सांगणारा संदेश घेऊन जाण्याची आणि टाकोटाक तिचं उत्तरही घेऊन येण्याची विनंती वर्षां ऋतूतील मेघाला केली आहे. यक्षाच्या या विनंतीचा मेघाने स्वीकार केल्यानंतर त्याने अलकापुरीला जाण्याचा मार्ग सविस्तरपणे त्याला कथन केला आहे. या मार्गाचं अतिशय रसाळ वर्णन पूर्वमेघात येतं. रामगिरी ते कैलास पर्वतातील अलकापुरीच्या मार्गावरील डोंगरदऱ्या, नद्या, तिथला निसर्ग, रम्य परिसर यांचं अत्यंत तरल, काव्यात्म, भावकोमल अन् शृंगाररसयुक्त वर्णन यक्षानं ‘मेघदूता’त केलं आहे. तर उत्तरमेघात यक्षाने विरहवणव्यात होरपळणाऱ्या आपल्या पत्नीला द्यावयाचा उत्कट संदेश कथन केलेला आहे.

कुबेराच्या दरबारातील या यक्षाने आपल्या प्राणप्रिय पत्नीच्या प्रेमात आकंठ बुडाल्याने कामात कुचराई केल्याने संतप्त झालेला कुबेर त्याला वर्षभराची अतिशय दूरस्थ अशा रामगिरीत हद्दपारीची शिक्षा ठोठावतो. पत्नीचा क्षणिक विरहसुद्धा सहन न करू शकणाऱ्या यक्षासाठी ही युगानुयुगांची काळकोठडीच असते. आपल्या प्रिय पत्नीपासून विलग होण्याची कल्पनाही करू न धजणाऱ्या यक्षाकरता ही शिक्षा दु:सहच असते. परंतु हातून नकळतपणे घडलेल्या प्रमादामुळे ती भोगण्यावाचून गत्यंतरही नसते. या शिक्षेच्या कालावधीतील आठ महिने यक्षाने कसेबसे निभावून नेले असले तरी वर्षांऋतूच्या आगमनाने मात्र विरहव्याकूळ यक्षाची असह्य़ तगमग सुरू होते. प्रियेच्या आठवणींनी.. तिच्यासोबतच्या उत्कट शृंगाराचे क्षण आठवून त्याचं काळीज शतश: विदिर्ण होतं. दिवस-रात्र त्याला तिचाच ध्यास लागून राहिलेला असतो. कशी असेल ती? आपल्या आठवणींनी तिची काय अवस्था झाली असेल? आपल्याला ती विसरली तर नसेल? हा प्रदीर्घ विरहकाळ ती कसा व्यतीत करीत असेल? इतके दिवस आपली काहीच खबरबात न मिळाल्यानं आपलं काही बरं-वाईट झालं नसेल ना, अशी आशंका तिच्या मनात आली असेल का?.. एक ना दोन- असंख्य प्रश्नांचे चिंतातुर भुंगे यक्षाला जाळत राहतात.

यावर एकच उपाय : तिला आपलं क्षेमकुशल कळवायला हवं!

पण कुणाकडे?

..आणि त्याला नभांगण झाकोळून टाकलेले मेघ दिसतात. ह्य़ांनाच आपण आपला संदेश पोचवायला का सांगू नये? ही कल्पना सुचताच तो मेघाला तशी विनवणी करतो. मेघही प्रारंभी काहीसं आढेवेढे घेत अखेरीस याला राजी होतात.

आणि.. ‘मेघदूत’ जन्माला येतं.

पुण्याच्या ‘प्रवेश’ या संस्थेनं नुकताच ‘मेघदूत’ या नृत्यनाटय़ाचा नितांतसुंदर प्रयोग मुंबईत सादर केला. ‘मेघदूता’ची पाश्र्वभूमी असलेलं मोहन राकेश यांचं ‘आषाढ का एक दिन’ हे नाटक कालिदासाच्या जीवनकथेवर आधारित आहे. भारतीय रंगभूमीवर कालिदासाच्या ‘मेघदूत’वर सादर झालेली बहुतेक नाटकं ही त्यातल्या विरहव्याकूळ यक्षाला केन्द्रस्थानी ठेवून केली गेली आहेत. परंतु या नाटकात मात्र प्रत्यक्षात ‘मेघदूत’च सादर केलं गेलं आहे. यक्षाने वर्णिलेलं रामगिरी ते अलकापुरी हे मार्गक्रमण.. त्यातल्या वर्णनाबरहुकूम नृत्यनाटय़रूप- हा या नाटकाचा गाभा आहे. संस्कृत नाटकांचा तांत्रिक बाज स्वीकारून लेखक प्रणव पटवारी यांनी त्याचं केलेलं मराठी रूपांतर अतिशय अलवार अन् उत्कट उतरलं आहे. निर्माते-दिग्दर्शक निखिल शेटे यांनी ते तितक्याच हळुवारपणे आणि सर्जनशीलतेनं मंचित केलं आहे.

खरं तर रामगिरी ते अलकापुरी या मार्गातील प्रदेशांचं वर्णन मूळ काव्यात कितीही रोमॅंटिक वाटत असलं तरी प्रत्यक्ष सादरीकरणात ते मंचित करणं तसं अवघडच. तथापि, या प्रयोगात दिग्दर्शकानं हे शिवधनुष्य लीलया पेललेलं आहे. नृत्यनाटय़ाच्या फॉर्ममध्ये ते सादर केल्यामुळेच त्यास योग्य तो न्याय मिळू शकला आहे. मेघास निरोप घेऊन जाण्याकरता साकडे घालण्यापासून ते त्याला त्यासाठी राजी करताना यक्षाला पडलेले प्रचंड सायास.. त्यानं आपल्या मधुर वाणीनं आणि शब्दलाघवानं त्याला हे निरोप्याचं काम करायला भाग पाडणं.. त्यानंतर मेघाला प्रस्थानमार्ग समजावून सांगताना त्याला त्याची भुरळ पडेल अशा तऱ्हेनं मार्गातील निसर्ग आदीचं केलेलं भावपूर्ण वर्णन.. आणि प्रत्यक्ष अलकापुरीत मेघ पोहोचल्यानंतर आपल्या प्रियेला अचूक ओळखण्यासाठी सांगितलेली खूण.. तिला द्यावयाचा भावविभोर संदेश.. असा प्रदीर्घ पल्ला मेघदूतात वर्णिलेला आहे. नृत्यनाटय़ाच्या फॉर्मात कालिदासकृत हे दृक्-श्राव्य-काव्य अत्यंत काव्यामयतेनं मंचित झालं आहे. यातील प्रदेशवर्णनाचा भाग गद्य असला तरी त्याची कथनशैली काव्यात्म आहे. त्याला लय-ताल-नादमय नृत्यांची जोड मिळाल्यानं हा नाटय़ानुभव अविस्मरणीय झाला आहे. भरतमुनींच्या नाटय़शास्त्राशी प्रामाणिक राहत योजलेलं नेपथ्य प्रथमदर्शनीच विषयाशी प्रेक्षकाला अवगत करतं. नटी-सूत्रधार प्रवेशातून ‘मेघदूता’कडे जाण्याची युगत इथं चपखल ठरली आहे. यातील गाणी शास्त्रीय संगीतात बांधलेली असल्यानं त्यातून आवश्यक वातावरणनिर्मिती आपसूकच होते.

यात किंचित खटकलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे यातले (थोडकेच असलेले) ब्लॅकआऊट्स. त्यांची खरं तर काहीच आवश्यकता नव्हती. त्याने थोडासा रसभंग होतो. तसंच लेव्हल्सच्या रचनेमुळे पाश्र्वभागी विराजमान असलेले वादक झाकले जातात.. हेही तसं रसभंग करणारंच. या तशा नगण्य त्रुटी वगळता ‘मेघदूत’चा हा दृष्ट लागण्याजोगा प्रयोग उत्तरोत्तर विलक्षण रंगत जातो. या प्रयोगात सर्वाचंच योगदान अत्यंत मोलाचं आहे. अक्षय अंबेकर (नेपथ्य), विराज देसाई (प्रकाशयोजना), देवेन्द्र भोमे (ध्वनिसंकेत), अमीरा पाटणकर, रमा कुकनूर-कानिटकर, मधुरा आफळे (नृत्यआरेखन), उल्हेश खंदारे-प्रमोद खरटमल (रंगभूषा), जयदीप वैद्य (संगीत) यांनी ‘मेघदूत’ची तांत्रिक बाजू भक्कमपणे आणि यथार्थतेनं सांभाळली आहे. मयूरी अत्रे व आशुतोष मुंगळे (गायन), ब्रह्मानंद देशमुख (पखवाज), तुषार कदम (जेंबे/ डफ), केतन पवार (तबला), नितीश पुरोहित (सरोद), मंदार बगाडे (सारंगी), रेणुका जोशी (सितार) आणि अनुप कुलथे (व्हायोलिन) यांनी त्यांना उत्तम संगीतसाथ केली आहे.

यातल्या सगळ्याच कलाकारांनी आपल्या भूमिका चोख वठवल्या आहेत. जयदीप वैद्य यांनी यातली यक्षाची भूमिका तर लाजवाबच साकारली आहे. त्यांना उत्तम गळा लाभला आहे. त्याचा सुयोग्य वापर करत त्यांनी यक्ष संस्मरणीय केला आहे. तन्वी कुलकर्णी (नटी) आणि सागर कानोले (सूत्रधार) यांचं लटके रुसवेफुगवे छानच. शमिका भिडे यांनी यक्षिणीची विरहार्तता उत्कटतेनं दर्शविली आहे. आशुतोष मुंगळे (कुबेर), अमीरा पाटणकर, रमा कुकनूर-कानिटकर व मधुरा आफळे यांनी मेघाची नानाविध रूपं नृत्यातून आणि भावमुद्रांतून प्रत्ययकारी केली आहेत.

हा सर्वागसुंदर प्रयोग रसिकांनी एकदा तरी आवर्जून अनुभवायलाच हवा.

रवींद्र पाथरे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2017 2:28 am

Web Title: meghdoot ballet troupe performance in mumbai
Next Stories
1 ..अशीही ठेकेदारी
2 संजय दत्तविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट; निर्मात्याला धमकावल्याचा आरोप
3 पाहाः शाहरुखने, हॉलिवूड दिग्दर्शकाला शिकवला ‘लुंगी डान्स’
Just Now!
X