नवीन वर्ष हे बॉलिवूडसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. या वर्षात अनेक मोठमोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे २०१९ मधले पाच मोठे बायोपिक हे जानेवारी महिन्यातच प्रदर्शित होणार आहे. त्यातले तीन मोठे बॉयोपीक हे एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत.

भाई : व्यक्ती की वल्ली
महाराष्ट्राचे आवडते लेखक पु.लं. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित ‘भाई: व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाचा पूर्वार्ध जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. पु.लंच्या आयुष्यातील अनेक महत्त्वपूर्ण घटना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अभिनेता सागर देशमुख या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ४ जानेवारीला या चित्रपटाचा पूर्वार्ध प्रदर्शित होत आहे. तर उत्तरार्ध फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

 

‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’
जम्मू- काश्मीरमधील उरी इथल्या लष्कराच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनं हल्ला केलानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून सर्जिकल स्ट्राईक केला होता. या सत्य घटनेवर आधारित ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आदित्य धार यांनी उरी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून विकी कौशल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. विकीसोबतच यामी गौतम परेश रावलदेखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हा चित्रपटदेखील ११ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर
त्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार असलेले संजय बारु यांनी लिहीलेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ पुस्तकावर आधारित ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा चित्रपट देखील जानेवारी महिन्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अनुपम खेर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भूमिका साकारत आहेत. सोनिया गांधी यांची भूमिका सुझैन बर्नट यांनी साकारलेली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून तो चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटातील काही दृश्य काढावीत अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. ११ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

ठाकरे
महाराष्ट्राच्या राजकारणातील हुकमी एक्का समजल्या जाणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे चित्रपटही जानेवारी महिन्यात प्रदर्शित होत आहे. राजकीय नेत्यावर आधारित या महिन्यातला हा दुसरा बायोपिक असणार आहे. नवाजुद्दीन सिद्दिकी या चित्रपटात बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारत आहे. संजय राऊत यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून अभिजीत पानसे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. २५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. याच दिवशी ‘सुपर ३०’, ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांशी’ आणि ‘चीट इंडिया’ हे चित्रपटही प्रदर्शित होत आहे.

सुपर ३०
आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित सुपर ३० हा चित्रपट देखील जानेवारी महिन्यात प्रदर्शित होत आहे. अभिनेता हृतिक रोशन या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. २५ जानेवारी २०१९ मध्येच सुपर ३० प्रदर्शित होत आहे.

मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांशी
झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांशी हा चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेत्री कंगना राणौत प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुराही कंगनानं सांभाळली आहे. चित्रपटाच्या कथानकावरून त्याला आधी विरोध करण्यात आला. त्यानंतर दिग्दर्शकांनी चित्रपट अर्ध्यावर सोडला. जेव्हा कंगनाने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली, तेव्हा अभिनेता सोनू सूदनेही काढता पाय घेतला. कंगनाच्या वारंवार हस्तक्षेपामुळे त्याने हा निर्णय घेतल्याची चर्चा होती. कंगनासोबतच यामध्ये अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी, डॅनी डेन्झोपा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.

चीट इंडिया
इंजीनिअर किंवा मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचा थप्पा मिळवण्यासाठी जो काही गैरकारभार चालतो, कशाप्रकारे डमी विद्यार्थांना परीक्षेसाठी बसवलं जातं, हे सगळं आगामी ‘चीट इंडिया’ या चित्रपटातून समोर येणार आहे.

देशाच्या शिक्षणव्यवस्थेतील भ्रष्टाचारावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात इमरान हाश्मी मुख्य भूमिका साकारत आहे. हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.