देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. तो रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. या कठिण काळात प्रेक्षकांना घरात बसून त्यांच्या आवडत्या मालिका पाहयला मिळाव्या म्हणून प्रशासनाने एक निर्णय घेतला. प्रेक्षकांच्या मागणीवरुन ९०च्या दशकातील लोकप्रिय मालिका ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ पुन्हा दाखवण्यात येत आहे. त्यानंतर सोशल मीडियावर ‘शक्तिमान’ ही मालिका देखील पुन्हा दाखवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. आता खुद्द शक्तिमानने यावर वक्तव्य केले आहे.

शक्तिमानची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना यांनी मालिकेबाबत एक मोठा खुलासा केला आहे. नुकताच त्यांनी या संदर्भात बॉम्बे टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी लवकरच शक्तिमान मालिकेचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले आहे.

‘गेल्या तीन वर्षांपासून आम्ही शक्तिमानच्या सिक्वेलवर काम करत आहोत. कारण प्रेक्षकांना शक्तिमानचे पुढे काय झाले हे जाणून घ्यायचे आहे’ असे मुकेश खन्ना यांनी म्हटले आहे. मालिकेसोबतच  शक्तिमानवर एक चित्रपट काढण्याची इच्छादेखील त्यांनी व्यक्त केली. या सिक्वेलमध्ये शक्तिमानला सुपरहिरोच्या सर्व शक्ती कशा प्राप्त झाल्या? नंतर शक्तिमान कुठे गेला? का गेला? अशा अनेक प्रश्नांची कधी न मिळालेली उत्तरे मिळणार असल्याचे म्हटले जाते.

नव्वदच्या दशकात दूरदर्शन वाहिनीवरील ‘शक्तिमान’ ही एक लोकप्रिय मालिका होती. त्यावेळी शक्तिमान या पहिल्या इंडियन सुपरहिरोने अगदी लहान मुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनावर जादू केली होती. अनेक लहान मुलांनी तर शक्तिमान प्रमाणे उडण्याचा देखील प्रयत्न केला होता. मालिका १३ सप्टेंबर १९९७ साली सुरु झाली होती आणि २७ मार्च २००५ मध्ये मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. आता पुन्हा एकदा शक्तिमान प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने सर्वचजण आनंदी आहेत.