स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. मालिकेत माऊचं साजिरी असं नामकरण झालंय. तिच्या वडिलांनी तिचा मुलगी म्हणून स्वीकार केलाय. त्यामुळे मालिकेत सध्या आनंदाचं वातावरण आहे. आता तर साजिरीने आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी विलास ऑटोमोबाईल्स नावाने छोटंस दुकान थाटलं आहे. साजिरीने वडिलांचं आयुष्य खऱ्या अर्थाने साजरं केलं आहे. मुलगी झाली हो मालिकेतला हा अत्यंत भावनिक प्रसंग विलास पाटील ही भूमिका साकारणाऱ्या किरण मानेंच्या खऱ्या आयुष्याशी साधर्म्य साधणारा आहे. हा भावनिक प्रसंग शूट करताना किरण माने यांच्यासमोर जुन्या दिवसांचा अल्बम उलगडला. यासंबंधी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या भावनांना वाट करुन दिली.

किरण माने यांच्या शब्दात तो संघर्षमय प्रवास
संघर्षांच्या दिवसांबद्दल सांगताना किरण माने म्हणाले, ‘लै भयाण दिवस होते ते भावांनो…नाटक-अभिनयाचा ‘नाद’ सोडून गुपचूप सातारला येऊन, हायवेला वाढे फाट्यावर ‘किरण ऑटोमोटिव्ह’ हे दुकान टाकून बसायला लागलं होतं. जवळपास सतरा-अठरा वर्षांपुर्वीची गोष्ट… लै दोस्तांना म्हायतीय.. पन नविन दोस्तांसाठी परत एकदा. कारन बी तसंच हाय. सातार्‍यात हायवेवरच्या माझ्या इंजिन ऑईलच्या दुकानात बसलोवतो …मनाविरूद्ध नाटक – अभिनय सोडून ‘इंजिन ऑईल’च्या धंद्यात अक्षरश: घुसमटलोवतो…दुर्दैवानं दुकान भारी चालू लागलं आनी जास्तच अडकलो.. ‘पैसा का पॅशन’?? डोकं भिर्रर्रर्र झालंवतं… पायाला भिंगरी लागलेल्या माझ्यासारख्या भिरकीट डोक्याच्या पोराचं बूड एके ठिकानी स्थिर झाल्यामुळं घरातले सगळे मात्र लैच आनंदात होते. तर एक दिवस दुकानात हिशोबाची वही काढताना अचानक आदल्या दिवशीच्या पेपरचं रद्दीसाठी काढून ठेवलेलं एक पान पायाशी पडलं…छोट्या जाहीराती असलेलं ते पान होतं. मी ते परत वर ठेवलं. परत कायतरी करत असताना बहुतेक फॅनच्या वार्‍यानं ते पान परत खाली पडलं…आता लैच गडबडीत असल्यामुळं मी ते पान टेबलवर ठेवलं…नंतर जेवनाच्या वेळी टिफीनखाली त्यो पेपर घेताना त्यावर ‘पं. सत्यदेव दूबे’ अशी अक्षरे दिसल्यासारखी झाली… आग्ग्गाय्यायाया.. डोळं चमाकलं.. कुतूहल चाळवलं ! पुण्यातल्या ‘समन्वय’तर्फे पं. सत्यदेव दुबे यांची ‘अभिनय कार्यशाळा’ आयोजित करन्यात आलीवती..ती तीन-चार ओळींची लै छोटी जाहीरात होती. माझ्या मनात काहूर माजलं… च्यायला आपन काय करतोय हितं? काय करनारंय पुढं हे दुकान चालवून ?? आयुष्यात ‘नाटक’ नसंल – ‘अभिनय’ नसंल तर काय अर्थय जगण्यात??? अशा विचारांनी डोक्याचा भुगा झाला. एवढ्यात शेजारपाजारचे दुकानदार – मॅकेनिक यांच्या हाका ऐकू आल्या “ओ किरनशेठ ,या जेवायला”… अंगावर सर्रकन काटा आला ! हितनं पुढं आयुष्यभर माझी ही वळख असनारंय का ? किरणशेठ? ह्यॅट ..अज्जीब्बात नाही ! मी तसाच न जेवता उठलो , ‘समन्वय’ च्या संदेश कुलकर्णीला फोन लावला..आणि दुकानाला कुलूप लावलं ! (ते कुलूप नंतर उघडलंच नाही , आजपर्यंत !)” या शब्दात किरण यांनी त्यांचा अनुभव मांडला आहे.

chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Mane (@kiranmane7777)

“मुलगी झाली हो मालिकेत माऊनं विलाससाठी उभ्या केलेल्या ‘विलास ऑटोमोबाईल्स’चा जो सिन बघाल, तो करत असताना… मी ते दुकान पाहिलं आहे. इंजिन ऑईल्सचे कॅन्स पाहिले आहेत. तो ऑईल-ग्रीसचा गंध आला आणि या अठरा वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींनी मनात गर्दी केली… मी पाणावलेले डोळे लपवत होतो.. तिथं उपस्थित असलेल्या कलाकारांमध्ये एकजण असा होता, ज्यानं माझं ते दुकान आणि तो प्रवास जवळून पाहिला आहे. तो म्हणजे अशोकची भुमिका करणारा संतोष पाटील. त्यानं माझे पाणावलेले डोळे टिपले आणि आठवणीतल्या ‘किरणशेठ’ला घट्ट मिठी मारली.”

किरण माने यांच्या संघर्षाचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. मुलगी झाली हो मालिकेत ते साकारत असलेल्या वडिलांच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते आहे. बाप-लेकीच्या नात्यातले अनेक भावनिक प्रसंग मालिकेच्या यापुढील भागातही पाहायला मिळणार आहेत.