बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि दाक्षिणात्य सुंदरी तापसी पन्नू यांनी २०१५ मध्ये ‘बेबी’ चित्रपटात एकत्र काम केलं. आता ही जोडी पुन्हा एकदा ‘नाम शबाना’ या चित्रपटातून स्क्रिन शेअर करणार आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला असून हा ‘बेबी’ चा प्रिक्वेल असल्याची चर्चा आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या बॉलिवूड पदार्पणापासूनच अनेकांचे लक्ष वेधत आहे. काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘पिंक’ या चित्रपटातून साकारलेल्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी चित्रपट रसिक आणि समीक्षकांनी तापसीचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले होते. त्यामुळे या चित्रपटानंतर ही अभिनेत्री कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याबाबत उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत होते. पण, आता प्रेक्षकांची उत्सुकता फार काळ ताटकळत न ठेवता तापसी तिच्या आगामी चित्रपटासह लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. तापसीने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन ‘नाम शबाना’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे.

तापसीने शेअर केलेला हा फोटो पाहताना तीसुद्धा खिलाडी कुमारच्याच पावलावर पाऊन ठेवत वेगळ्या धाटणीचे चित्रपट करण्यावर भर देत आहे असेच दिसतेय. तापसीच्या या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक खिलाडी कुमारनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा फर्स्ट लूक पाहताना एका गोष्टीचा अंदाज येतोय, की ‘पिंक’ या चित्रपटातील भूमिकेपेक्षा ‘नाम शबाना’ या चित्रपटातील तापसीची भूमिका फार वेगळी असेल. चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे भय नसलेली आणि आत्मविश्वास ओसंडून वाहणारी तापसी या फर्स्ट लूकमध्ये दिसत आहे. त्यामुळे बेबी या चित्रपटामध्ये तापसीची भूमिका आणि तिचा चित्रपट निवडीचा कल पाहता या चित्रपटातून नक्कीच एका वेगळ्या कथानकाला हात घालण्यात येणार आहे असे दिसतेय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटात अ‍ॅक्शन, रोमान्स, थरार यापैकी नेमके काय अनुभवायला मिळणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. तिची उत्सुकता तिने ‘हमने रूमाल रख दिया हैं..’ अशा कॅप्शनसह ट्विटरवर शेअर केली. या फर्स्ट लूकमध्ये ती पारंपारिक वेशात दिसत असून खुपच खंबीरही दिसत आहे. अक्षय कुमार या चित्रपटामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असून तोही या चित्रपटाबद्दल उत्सुक आहे. खिलाडी कुमारने शेअर केलेल्या या फोटोसोबतच त्याने ‘नाम शबाना’ची प्रदर्शित होण्याची तारीखही जाहिर केली आहे. ३१ मार्च २०१७ ला तापसीचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.