छळ, अपमान आणि अन्यायाला वाचा फोडणाऱ्यांनाच भारतात नोटीस पाठवली जाते, अशा शब्दात अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर आणि विवेक अग्निहोत्री यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मला धमकी देत आहेत, असा आरोपही तिने केला आहे.

अभिनेत्री तनुश्री दत्ताने काही दिवसांपूर्वी नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. २००८ साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले, असा आरोप तिने एका मुलाखतीत केला. यानंतर तनुश्रीने सातत्याने नाना पाटेकर, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यावर आरोप केले. या पार्श्वभूमीवर नानाा पाटेकर आणि विवेक अग्निहोत्री यांनी तनुश्रीला नोटीस बजावली होती.  तनुश्रीने माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे या नोटीशीत म्हटले होते.

या नोटीशीवर तनुश्रीने बुधवारी रात्री प्रतिक्रिया दिली आहे. तनुश्री म्हणाली, मला दोन नोटीस आल्या आहेत. एक नाना पाटेकर यांच्याकडून तर दुसरी विवेक अग्निहोत्री यांच्याकडून. भारतात तुम्ही छळ, अपमान आणि अन्यायाविरोधात आवाज उठवल्यास तुम्हालाच नोटीस पाठवली जाते, असे तिने म्हटले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मला धमकी देत असून मला कोर्टात खेचण्याचा इशारा दिला जात आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत भारतातील न्यायव्यवस्था महिला आणि प्रसार माध्यमांना गप्प ठेवू शकते, असे तिने म्हटले आहे.