कोणतेही चांगले काम कधीही वाया जात नाही, त्याची कुठेना कुठे कदर होतेच. अभिनेता आणि दिग्दर्शक अजय फणसेकरबाबत अगदी तेच झाले. ‘रात्र आरंभ’ हा चित्रपट नासिरुद्दीन शाहच्या पाहण्यात आला तेव्हा गुणवत्तेची कदर करणारा नासिर इतका आणि असा प्रभावित झाला की त्याने त्याक्षणीच ठरवले की या चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या चित्रपटातून भूमिका साकारायला हवीच. अजयला हे समजताच त्याचा हुरुप वाढला आणि त्याने त्याक्षणीच ठरवले की,  तूर्त मराठी चित्रपटापासून थोडा वेळ बाजूला राहूयात आणि नासिरुद्दीन शाहसोबत हिंदी चित्रपटाची निर्मिती करूया.
त्यातूनच अजय फणसेकरने ‘एनकाऊंटर’ या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन केले.  त्यामध्ये नासिरुद्दीन शाहसोबत दिलीप प्रभावळकर, तारा देशपांडे आणि राहुल मेहंदळे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यात ‘एनकाऊंटर’ या चित्रपटाला चार विभागात नामांकन मिळाले आणि त्यासाठी अजय फणसेकर, दिलीप प्रभावळकर असे चौघेजण गेले. अंतिम फेरीत पुरस्कार मिळाला नाही तरी इतकी प्रगती उत्साह जनक ठरली.
हे आताच सांगायचा योग का आला? कारण, अजय फणसेकर दिग्दर्शित ‘रामचंद्र पुरुषोत्तम जोशी’ हा फॅन्टसी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून, त्यानिमित्ताने दिलीप प्रभावळकर यांची भेट झाली असता गप्पांच्या ओघात त्यांनी हा अनुभव सांगितला.
हे सगळं ऐकल्यावर चांगल्या कामाची कुठे तरी योग्य कदर होतेच यावरचा विश्वास वाढतो त्याचीच जास्त गरज आहे.