ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह कायमच त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि ठाम भूमिका घेण्यामुळे चर्चेत येत असतात. काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनावर ते व्यक्त झाले होते. ट्विटरवरुन त्यांनी त्यांची भूमिका मांडली होती. त्यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. मात्र, आता त्यांची पत्नी आणि अभिनेत्री रत्ना पाठक यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं ट्विट नसीरुद्दीन शाह यांचं नसून त्यांचं कोणतं ट्विटर अकाऊंटच नाहीये, असा खुलासा रत्ना पाठक यांनी केला आहे. तसंच शेतकरी आंदोलनावर नसीरुद्दीन यांनी भूमिका मांडली नाही. तर, ते ट्विट एका फेक अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रकरणी सायबर क्राइम सेलकडे तक्रार करण्यात आली आहे.

नेमकं काय होतं ‘त्या’ ट्विटमध्ये?
नसीरुद्दीन शाह यांच्या फेक अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या ट्विटमध्ये त्यांनी शेतकऱ्यांची पाठराखण केली होती. तसंच बॉलिवूड कलाकारांवर टीकास्त्र डागलं होतं. शांत राहणं म्हणजे अन्याय करणाऱ्याला साथ देणं. जर शेतकऱ्यांना पाठिंबा दिला तर आपलं खूप मोठं नुकसान होईल, असं बॉलिवूडमधील काही जणांना वाटत आहे. पण, त्यांनी इतकं कमावून ठेवलंय की त्यांच्या पुढील सात पिढ्या आरामात बसून खातील. त्यामुळे त्यांनी नेमकी भूमिका घ्यावी, असं त्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.