योग्य व्यक्तिरेखा आणि अफलातून अभिनय यासाठी प्रसिद्ध असलेला बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आता त्याच्या आगामी सिनेमात लेखकाच्या व्यक्तिरेखेमध्ये दिसणार आहे. नवाजुद्दीन सादात हसन मंटो यांच्या आयुष्यावर आधारीत ‘मंटो’ या सिनेमाच्या तयारीला लागला आहे. नवाजुद्दीनने या सिनेमातला त्याचा पहिला लूक त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोला पाहून लक्षात येते की त्याने हुबेहुब ‘मंटो’सारखे बनण्याचा प्रयत्न केला आहे. या ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटोत नवाजुद्दीनने खादीचा कुर्ता घातला आहे आणि चश्माही लावला आहे.

नंदिता दास या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहे. तिने या सिनेमासाठी नवाजुद्दीन आणि रसिका दुग्गल यांची स्क्रिन टेस्ट घेतली होती. रसिका या सिनेमात मंटोची पत्नी म्हणजे साफिया यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. हा सिनेमा मंटो यांच्या आयुष्यातली अनेक पाने उलघडणारा असणार आहे. यात प्रेक्षकांना मंटो यांचा स्वभाव, संवेदशीलता, धाडस आणि भीती यांच्याबद्दल कळणार आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, नंदिताने सांगितले की, ‘अजून या सिनेमावर काम सुरु आहे. मंटो यांचा लूक आणि त्यांचे व्यक्तिमत्व यावर अजूनही काम सुरु आहे. तसेच मंटो यांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी नवाजपेक्षा दुसरा कोणताच अभिनेता इथे एवढा चपखल बसू शकला नसता.’

हे पहिल्यांदा होत आहे की नवाज एका लेखकाच्या भूमिकेत दिसेल. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, ‘मी मंटो यांच्याबद्दल खूप काही वाचत असतो. काही लेख जे त्यांनी लिहिले आहेत. मंटो यांच्या २५ व्या वयापासून ते ३५ व्या वयापर्यंतची व्यक्तिरेखा मी साकारत आहे. सध्या माझे ऑफिस हे तेव्हाच्या काळातल्या कपड्यांनी आणि बुटांनी भरलेले आहे. कारण मंटो हे खूप साधे होते. त्यामुळे उगाच आम्ही फार काही वेगळे करायला जाणार नाही. ही व्यक्तिरेखा जेवढी साधी ठेवता येईल तेवढा ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यांचा कोणताही व्हिडिओ उपलब्ध नाहीये, त्यामुळे मी त्यांच्या बोलण्याच्या अंदाजाची नक्कल करण्याचा प्रयत्न करेन. त्यांच्या भाषणातूनच मला त्यांचा बोलण्याचा अंदाज पकडावा लागेल.’