23 January 2021

News Flash

निर्मिती सावंत का म्हणतेय ‘एक टप्पा आऊट’?

'क्रिकेटचा फिव्हर सध्या सगळीकडेच आहे. या फिव्हरमध्ये अगदी चपखल बसणारं हे नाव आहे.'

निर्मिती सावंत

स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या ५ जुलैपासून ‘एक टप्पा आऊट’ हा नवा कॉमेडी शो सुरु होतोय. संपूर्ण महाराष्ट्रातून अस्सल विनोदवीरांचा शोध या कार्यक्रमातून घेतला जाणार आहे. महाराष्ट्रात दडलेल्या या हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम करणार आहेत कॉमेडीचा बादशाहा जॉनी लिव्हर आणि मराठीतले दोन दिग्गज कलाकार अर्थातच निर्मिती सावंत आणि भरत जाधव. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनेत्री निर्मिती सावंतशी साधलेला हा खास संवाद..

‘एक टप्पा आऊट’ या कार्यक्रमाचं वेगळेपण काय आहे?

स्टॅण्डअप कॉमेडी आणि थक्क करायला लावणारं स्पर्धकांचं टॅलेण्ट हे या शोचं वेगळेपण म्हणता येईल. एकतर बरीच वर्ष आपण फक्त स्किट्स बघत आलोय. खूप दिवसांनंतर आपण स्टॅण्डअप कॉमेडी पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टॅण्डअप कॉमेडीचा बादशहा जॉनी लिवर आणि महाराष्ट्राला खळखळून हसवणारा अभिनेता भरत जाधव हा शो जज करणार आहेत. त्यामुळे या शोसाठी जेव्हा जज म्हणून विचारणा झाली तेव्हा मी लगेचच होकार कळवला. या शोच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातलं टॅलेण्ट एकाच मंचावर येणार असल्यामुळे प्रेक्षकांसाठी अनोखी पर्वणी असेल.

स्पर्धकांविषयी काय सांगाल? त्यांना काही खास टिप्स दिल्या आहेत का?

‘एक टप्पा आऊट’च्या निमित्ताने मला खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत. मी अपग्रेड होतेय असं म्हण्टलं तर वावगं ठरणार नाही. स्पर्धकांचा उत्साह आणि टॅलेण्ट खरोखर थक्क करणारं आहे. या कार्यक्रमाचा पहिला भाग शूट झाला आहे. हा भाग प्रत्यक्ष जज केल्यानंतर हा शो स्वीकारण्याचा माझा निर्णय योग्य होता असं मला वाटतंय. प्रत्येक स्पर्धकाची वेगळी अशी खासियत आहे. आंबटगोड मालिकेनंतर खूप वर्षांनी स्टार प्रवाहसोबत काम करतेय याचा प्रचंड आनंद आहे. एपिसोडच्या पहिल्या दिवशी स्टार प्रवाहकडून खूप छान स्वागत करण्यात आलं. हा जिव्हाळा आणि प्रेम असाच कायम राहो हीच इच्छा व्यक्त करेन.

जॉनी लिव्हर, भरत जाधव आणि तुम्ही एकत्र एका मंचावर आल्यावर सेटवर नेमकी काय धमाल घडते?

आम्हा तिघांचीही खूप छान गट्टी जमलीय. प्रत्येक स्कीटनंतर जॉनीभाई जे कमेण्ट्स देतात तेव्हा कमेण्ट्स सोबतच काहीतरी परफॉर्म करुन दाखवतात जे मला खूप आवडतं. सेटवरचं वातावरणच बदलून जातं. त्यामुळे या शोला खूप वेगळी लज्जत आलीय. आतापर्यंत जॉनी भाईंना आपण वेगवेगळ्या सिनेमांमधून, कार्यक्रमांमधून पाहात आलोय. विनोदाच्या बादशहाला आता ‘एक टप्पा आऊट’मधून भेटणं म्हणजे पर्वणी असेल.

‘एक टप्पा आऊट’ हे नावंही खूप वेगळं आहे. त्याविषयी…

हो खरंय. क्रिकेटचा फिव्हर सध्या सगळीकडेच आहे. या फिव्हरमध्ये अगदी चपखल बसणारं हे नाव आहे. नवख्या स्पर्धकांना एका योग्य संधीची गरज असते. स्टार प्रवाह वाहिनीने हे व्यासपीठ त्यांना उपलब्ध करुन दिलंय. त्यामुळे या संधीचा पुरेपुर फायदा करुन घ्यावा असं दर्शवणारं एक टप्पा आऊट हे अगदी योग्य नाव आहे असं मला वाटतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 4:44 pm

Web Title: nirmiti sawant interview about ek tappa out comedy show with johnny lever ssv 92
Next Stories
1 वृक्षप्रेमी सयाजी शिंदे येणार ‘कोण होणार करोडपती’च्या हॉट सीटवर
2 Bigg Boss Marathi 2 : नेहाच्या टास्क खेळण्याविषयी तिचा नवरा म्हणतो…
3 ‘तारक मेहता..’मधील बबीता गेली टप्पूसोबत फिरायला
Just Now!
X