‘रॉक ऑन टू’ चित्रपटातील गाण्याचे चित्रीकरण; दिवसभर चित्रीकरण असल्याने पर्यटकांचा हिरमोड

‘गेट वे ऑफ इंडिया’वर सुरू असलेल्या ‘रॉक ऑन टू’ या हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणाचा फटका बुधवारी पर्यटकांना बसला. चित्रीकरणामुळे गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात जाण्यास अटकाव करण्यात आल्याने तेथे फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला. काही नाराज पर्यटकांनी तेथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला पण कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मे महिन्याच्या सुट्टीचा हंगाम आता आठवडाभरात संपणार असून शाळा-महाविद्यालये सुरू होणार आहेत. त्यामुळे सुट्टी संपण्याच्या शेवटच्या कालावधीत गेट वे ऑफ इंडियावर पर्यटकांची खूप मोठी गर्दी उसळली होती.

केवळ मुंबईच नव्हे तर राज्यभरातून तसेच देश-विदेशातूनही पर्यटक येथे मोठय़ा संख्येने भेट देत असतात. बुधवारी सकाळी पर्यटक येथे आले तेव्हा लाईट्स, कॅमेरा आणि परिसरात उभारलेले मोठे व्यासपीठ त्यांना पाहायला मिळाले. चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे ‘गेट वे’वर प्रवेश करण्यास तसेच फिरण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याची तक्रार पर्यटकांकडून करण्यात आली.

‘रॉक ऑन टू’ या हिंदी चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण तेथे सुरू असून काही सहकलाकारांसह अभिनेता फरान अख्तर या चित्रीकरणात सहभागी झाला आहे. गाण्याच्या चित्रीकरणासाठी परिसरात मोठे व्यासपीठ उभारण्यात आले असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले.

दरम्यान पोलिसांसह सर्व शासकीय यंत्रणांची रीतसर परवानगी घेऊनच चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असल्याचे कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय गाडगीळ यांनी ‘लोकसत्ता मुंबई’ला सांगितले. चित्रीकरण सुरू असलेल्या ठरावीक भागात पर्यटकांना जाण्यास परवानगी नव्हती पण ‘गेट वे’च्या अन्य परिसरात पर्यटकांच्या फिरण्यावर किंवा प्रवेशावर कोणतीही प्रवेश बंदी नाही. हे चित्रीकरण संध्याकाळपर्यंत सुरू राहणार असून तेथे पुरेसा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला असल्याचे गाडगीळ म्हणाले.

दरम्यान नौदल, राज्य शासन किंवा अन्य खासगी संस्थांकडून जेव्हा ‘गेट वे’वर कार्यक्रम आयोजित केले जातात तेव्हाही त्या विशिष्ट भागात सर्वसामान्य नागरिक किंवा पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात येते.

केवळ चित्रीकरणामुळेच पर्यटकांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे, असे नाही. सार्वजनिक ठिकाणी किंवा अशा पर्यटन स्थळी चित्रीकरणामुळे तेथे जाण्यास लोकांना अडथळा होत असेल तर अशा ठिकाणी चित्रीकरणावरच बंदी घालण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे मत चित्रपटसृष्टीशी संबंधित काही जणांनी व्यक्त केले.

पर्यटनस्थळी अशा प्रकारे पर्यटकांना आडकाठी होत असते हे जरी खरे असले, तरी रीतसर परवानगी घेऊनच हे चित्रीकरण होत असते. संबंधित यंत्रणांकडून चित्रीकरणापोटी शुल्कही वसूल केले जाते. रेल्वे प्रशासनाला अशा चित्रीकरणातून मोठा महसूल मिळत असतो.

परवानगी न घेता चित्रीकरण सुरू असेल तर ते चुकीचे आहे. त्यावेळी संबंधितांच्या विरोधात कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, पण रीतसर परवानगी घेऊन चित्रीकरण केले जात असेल तर काहीच करता येणार नाही, या मुद्दय़ाकडेही एका राजकीय पक्षाच्या चित्रपट शाखेच्या पदाधिकाऱ्याने लक्ष वेधले.