असिफ बागवान

एका वेबसीरिजकडून प्रेक्षकांच्या काय अपेक्षा असतात? एक तर ती मनोरंजक असावी, तीत भरपूर थरार, रहस्य भरलेलं असावं, त्यात अनेक धक्कादायक वळणं असावीत आणि तिचा शेवट हा तितकाच उत्कंठा वाढवणारा असावा. तसं पाहिलं तर सध्या ओटीटी अर्थात नवरंजनाच्या फलाटावर उपलब्ध असलेल्या वेबसीरिजपैकी जवळपास ९० टक्के वेबमालिका या सूत्रात बांधलेल्या दिसतील. थरारक, उत्कंठावर्धक, गूढरम्य, भरपूर प्रणयदृश्यं असलेल्या, बोल्ड संवाद असलेल्या अशा वेबसीरिजना कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर तोटा नाही. कदाचित सरकारी र्निबधांमुळे जे सरसकट टीव्हीवर नाही दाखवता येणार, ते वेबसीरिजवर सहज दाखवलं जातं आणि मोठय़ा आवडीने पाहिलंही जातं. यापैकी अनेक वेबसीरिजचं कथासूत्र हे टीव्हीवर दाखवण्यात येणाऱ्या किंवा चित्रपटातून समोर आलेल्या कथासूत्रांशी मिळतंजुळतं असतं. म्हणजे, त्याचा साचा एकच असतो. अशा जुन्याच वाटणाऱ्या साच्यातून काढल्या असल्या तरी काही वेबसीरिज काही तरी नवीन पाहिल्याचा अनुभव देतात. हॉटस्टारवर महिनाभरापूर्वीच प्रदर्शित झालेली ‘आऊट ऑफ लव्ह’ ही त्यापैकीच एक.

‘पती, पत्नी और वो’ हा विषय फार पूर्वीपासून चित्रपट, टीव्ही, नाटकं एवढंच काय तर लिखित साहित्यप्रकारांतूनही हाताळण्यात आला आहे. सुखाने चाललेल्या संसाराला अचानक कुणाची दृष्ट लागते आणि जोडप्यापैकी कुणी एक वेगळय़ाच व्यक्तीत गुंतून पडतो. त्यातून निर्माण होणारा संशय, वाद, भांडणं, रुसवेफुगवे, कौटुंबिक तिढा असे सगळे मुद्दे हाताळून शेवटाकडे जाणाऱ्या शेकडो कहाण्या या माध्यमांतून प्रेक्षकांपर्यंत, वाचकांपर्यंत पोहोचल्या आहेत. एखाद्या कहाणीत पतीपत्नी पुन्हा एकत्र येतात, तर दुसऱ्या कहाणीत तिसऱ्या व्यक्तीची सरशी होते, एखाद्या कहाणीत यापैकी काहीच न होता सारेच वेगळे होतात किंवा काही गोष्टींमध्ये जोडप्यापैकी एकटय़ा पडलेल्यालाही आयुष्याचा नवा जोडीदार मिळतो. थोडक्यात काय, अशा कहाण्यांमध्ये पुढे काय घडणार, याचे अंदाज अगदी सुरुवातीपासूनच बांधणं सहज शक्य असतं. ‘आऊट ऑफ लव्ह’ नेमका हाच अंदाज चुकवते आणि प्रेक्षकाला शेवटच्या भागापर्यंत खिळवून ठेवते.

‘बीबीसी वन’ टीव्हीवर पाच वर्षांपूर्वी झळकलेल्या ‘डॉक्टर फॉस्टर’ या मालिकेवर ‘आऊट ऑफ लव्ह’ बेतलेली आहे. डॉ. मीरा कपूर (रसिका दुग्गल) आणि तिचा पती आकाश (पूरब कोहली) हे दाम्पत्य आपला मुलगा आणि आकाशची कर्करोगपीडित आई (सोनी राजदान) यांच्यासह कुन्नूरमध्ये राहत असतात. तेरा वर्षांच्या संसारानंतरही आकाश आणि मीरा यांच्यातले प्रेम ताजेतवाने आहे. अत्यंत सुखी संसार सुरू असतानाच एक दिवशी मीराला आकाशच्या मफलरवर एका स्त्रीचा केस आढळतो. तिच्या मनात संशय निर्माण होतो. पण पतीकडे त्याबाबत थेट विचारणा न करता ती आपल्या पद्धतीने त्या संशयाची पुष्टी करण्याचा प्रयत्न करते. येथूनच ही कहाणी नवनवीन वळणे घेण्यास सुरुवात करते. आकाशचं त्याच्या निम्म्या वयाच्या आलियासोबत सुरू असलेलं प्रेमप्रकरण मीरासाठी धक्कादायक असतं. पण या कुटुंबाच्या नजीकच्या वर्तुळात असलेल्यांना जणू याची आधीपासूनच कल्पना असते. यातून मीराला अनेक गोष्टी उलगडत जातात. आकाशने केलेला विश्वासघात तिच्यावर इतका मोठा मानसिक आघात करतो की, दिवसरात्र ती तेवढय़ा एका विषयाने पछाडली जाते. त्यासाठी ती आपली वैद्यकीय कारकीर्दही पणाला लावते. एवढंच नव्हे तर, आकाशच्या आर्थिक परिस्थितीचं सत्य जाणून घेण्यासाठी त्याच्या सीए मित्राशी शय्यासोबत करणंही तिला गैर वाटत नाही. हे सगळं सुरू असताना आसपासच्या मंडळींकडून सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी या कहाणीतील गुंता अधिकाधिक वाढवत जातात. दुसरीकडे, डॉ. मीरा ज्या रुग्णालयात कार्यरत असते, त्याची उपकथाही उलगडत जाते.

प्रत्येकी एक ते सव्वा तासाच्या पाच भागांत विभागल्या गेलेल्या ‘आऊट ऑफ लव्ह’च्या कथेचं सूत्र नवीन नाही. मात्र, त्या सूत्राभोवती ज्याप्रमाणे कहाणीतली पात्रं फिरत जातात आणि कथानकाने घेतलेली धक्कादायक वळणं हे पाचही भाग उत्कंठावर्धक बनवतं. याचं श्रेय सुयश त्रिवेदी आणि अभिरुची चंद या लेखक द्वयीला दिलं पाहिजे. जितकं कौतुक पटकथाकारांचं तितकंच दिग्दर्शकाचंही. तिग्मांशू धुलिया हे नावच दिग्दर्शकाचं कौशल्य काय पातळीवरचं आहे, हे सांगण्यास पुरेसं आहे. वरवर सरळ वाटणारी कथा अनपेक्षित वळणे घेत असताना मालिकेचा दृश्यपटही कमालीचे रंग बदलतो. त्याला साजेसं संगीतही प्रेक्षकांवर प्रभाव पाडणारं आहे.

‘आऊट ऑफ लव्ह’ची सर्वात शक्तिशाली गोष्ट म्हणजे, या वेबसीरिजची नायिका. रसिका दुग्गल या अभिनेत्रीने डॉ. मीरा कपूरची भूमिका अक्षरश: जिवंत केली आहे. पतीवर आणि कुटुंबावर जिवापाड प्रेम करणारी डॉ. मीरा ते पतीवर सूड उगवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असलेली डॉ. मीरा हे त्या पात्राच्या भावनिक स्थित्यंतराचं हुबेहूब दर्शन रसिकाने घडवलं आहे. आकाशच्या भूमिकेतील पूरब कोहली हा गुणी अभिनेता नेहमीप्रमाणे प्रभाव पाडून जातो. याखेरीज सोनी राजदान, हर्ष छाया, अंजन श्रीवास्तव यांचा तगडा अभिनय मालिकेच्या पटावरचा अभिनयाचा समतोल ढासळू देत नाही.

सध्या नवरंजनाच्या फलाटावर गुन्हेगारी, हिंसाचार, फॅण्टसी, रहस्यपट, भयपट अशा वेबसीरिजचा मारा होतो आहे. या भाऊगर्दीत ‘आऊट ऑफ लव्ह’ ही वेगळय़ा धाटणीची मालिका ठरते. अर्थात त्यात सस्पेन्स आणि थ्रीलर आहेच! त्यामुळे वीकेण्डला अवघ्या सहा तासांचं मनोरंजन हवं असेल तर ‘आऊट ऑफ लव्ह’ पाहायला हरकत नाही.