दिग्दर्शक विवेक बुधकोटी यांच्या ‘पाईड पायपर’ चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनेक चित्रपट महोत्सवातून उपस्पाथिती लावलेल्या या चित्रपटाने पाकिस्तानातील लाहोर येथे पार पडलेल्या ‘(एलयुएमएस – ‘लाहोर युनिर्व्हसिटी मॅनेजमेंट स्टडीज्) अांतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – २०१४’ मधील आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागात उत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक मिळवले आहे. या विषयी आपल्या भावना व्यक्त करताना चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक बुधकोटी म्हणाले, आपल्या शेजारचा देश पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या सन्मानाने आणि प्रशंसेने मला आनंद झाला आहे. हा चित्रपट पाकिस्तानी प्रेक्षकांना खूप आपलासा वाटल्याचे चित्रपट मोहत्सवाच्या व्यवस्थापकांकडून मला सांगण्यात आले. भौगोलिक दृष्ट्या आपण दोन वेगळे देश असलो, तरी आपल्यातील समान ऐतिहासिक धाग्यामुळे तेथील प्रेक्षक या चित्रपटाशी जुळणे स्वाभाविक असल्याचे ते म्हणाले.
चित्रपटाचा लेखक आणि सह-निर्माता रजित शर्मा म्हणाला, या चित्रपटाचे माझे दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ यांचा मला अभिमान आहे. पारितोषिकामुळे चित्रपट निर्मितीसाठी तुम्ही घेतलेल्या मेहनतीला ओळख प्राप्त होते. नक्कीच हा क्षण आमच्यासाठी आनंदाचा आहे.
या आधी ‘पाईड पायपर’ने दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट चित्रपटासाठीचे पारितोषिक मिळवले असून, मुंबई चित्रपट महोत्सव २०१३, फेर चित्रपट मोहस्तव – रिपब्लिक ऑफ कोरिया २०१३, अलेक्झांड्रिया चित्रपट महोत्सव – वॉशिंग्टन डीसी २०१३, फ्रीथॉट आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहत्सव – ऑरलॅंण्डो २०१३, शिकागो साऊथ एशियन चित्रपट महोत्सव २०१३, जोगजा एनईटीपीएसी एशिया चित्रपट महोत्सव – इंडोनेशिया २०१३, रफी पीर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – लाहोर २०१३, डारिंग इंडिपेन्डट फिल्म फेस्टिव्हल – टोरॅन्टो २०१३, ढाका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१४, दी इंडियन इंटरनॅशनल फिल्म ऑफ साऊथ आफ्रिका, बर्लिन इंटरनॅशनल डायरेक्टर्स लाऊंज सारख्या अनेक नावाजलेल्या महोत्सवांमध्ये उपस्थिती लावली आहे.
‘पाईड पायपर’ ही एका सामान्य जीवन जगणाऱ्या चुन्नीलाल नावाच्या धोब्याची कथा आहे. या चित्रपटात धोब्याची भूमिका अभिनेता राजपाल यादवने साकारली आहे. एका विचित्र अपघातात त्याच्याकडील गाढवाचा मेंदू त्याला ज्ञात होऊन अद्वितीय शक्ती प्राप्त झाल्याची अफवा गावात पसरते. त्याच्या या अद्वितीय शक्तिने गावातील लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. गावात त्याची लोकप्रियता वाढू लागते. त्याच्या या वाढत चाललेल्या लोकप्रियतेमुळे गावातील इतर प्रस्थापित व्यक्ती त्याची धास्ताती घेतात आणि त्याच्या लोकप्रियतेचा रथ थांबविण्याचा प्रयत्न करतात, वेळप्रसंगी त्याला संपविण्याचा देखील विचार करतात. चुन्नीलालला संपविण्यात या प्रस्थापितांना यश येते का? विनोदी धाटणीचा हा चित्रपट सध्याच्या प्रजासत्ताक भारतातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करतो.