गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला अभिनेता संजय दत्तचा ‘प्रस्थानम’ चित्रपट आज अखेर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट २०१०मध्ये प्रदर्शित झालेल्या दाक्षिणात्य चित्रपट ‘प्रस्थानम’चा रिमेक आहे. या चित्रपटात संजय दत्तसह अभिनेत्री मनिषा कोईराला मुख्य भूमिकेत असून जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, अली फजल आणि अमायरा दस्तूरने देखील महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाची निर्मिती संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तने केली आहे. थ्रिलर फॅमिली ड्रामा या प्रकारात मोडणाऱ्या ‘प्रस्थानम’ या चित्रपटाच्या निमित्ताने संजूबाबा आणि मनिषाची जोडी तब्बल दहा वर्षांनी पुन्हा एकत्र पाहता मिळत आहे.

कथा- या चित्रपटात राजकीय कुटूंबाची कथा दाखवण्यात आली आहे. संजय दत्त ‘एमएलए बलदेव प्रताप सिंह’, अली फजल ‘आयुष’, सत्यजीत दुबे ‘विवान’ आणि मनिषा कोईराला ‘सरोज’ या चार पात्रांभोवती चित्रपटाची कथा फिरताना दिसते. एक राजकीय नेता आणि दोन मुलांचा वडील या जबाबदाऱ्या सांभळताना संजय दत्त दिसत आहे.

रिव्ह्यू- ‘प्रस्थानम’ चित्रपटात उत्तर प्रदेशमधील बल्लीपूर येथे राहणाऱ्या आमदार बलदेव प्रताप सिंह यांची कथा दाखवण्यात आली आहे. सत्यजीत दुबे हा संजय दत्तचा मुलगा असून आयुष हा सावत्र मुलगा दाखवण्यात आला आहे. सत्यजीत हा थोडा रागिट आणि स्वभावाने विचित्र असल्यामुळे संजय दत्त आयुषला राजकीय वारस म्हणून घोषीत करतो. चित्रपटाची संपूर्ण कथा ही या तीन पात्रांवर केंद्रीत केली गेली आहे.

चित्रपटाचे पूर्वार्ध या सर्व पात्रांची ओळख करुन देण्यात निघून जाते. मात्र उत्तरार्धामध्ये दाखवण्यात आलेल्या ट्विस्टमुळे चित्रपटाची कथा प्रेक्षकांना बांधून ठेवते. दरम्यान चित्रपटात आयुषच्या प्रेयसीची भूमिका अमायरा दस्तूर साकारता दिसतेय. तर मनिषा कोईरालाच्या ड्रायवरची भूमिका जॅकी श्रॉफने साकारली आहे. हे सर्व पात्र जबरदस्ती चित्रपटामध्ये घेतल्याचे जाणवत आहे. चित्रपट अभिनेता चंकी पांडेने खलनायकाची भूमिका साकारली आहे आणि त्याची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला उतरली आहे.