देशोदेशीच्या समस्यांचा विचार करून त्या देशांमध्ये सामाजिक मोहीम राबविणाऱ्या ‘ग्लोबल सिटिझन’ या संस्थेसोबत सुरेल प्रवास करणारा ‘कोल्डप्ले’ हा बँड शनिवारी मुंबईत भारतातला आपला पहिलावहिला कार्यक्रम सादर करणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ७.४० मिनिटांनी भाषण करणार आहेत.

जगाला वेड लावणाऱ्या या बँडने मुंबईच्या पाश्चात्य संगीतप्रेमींमध्येही उत्साहाची लाट उसळली असली तरी मुंबईसह देशभरातील नागरिक चलनसंकटाने ग्रासून बँकांबाहेर रांगा लावत असतानाच अनेक पक्षांनी या कार्यक्रमाविरोधात सूर उमटविला आहे. जागतिक ख्याती लाभेपर्यंतचा या बँडचा प्रवासही आगळावेगळाच होता. लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये दाखल झालेल्या दोन तरुणांना संगीताच्या ओढीने एकत्र आणले. त्यांना आणखी दोन संगीतवेडय़ांची साथ लाभत गेली. छोटय़ा क्लबमध्ये बँड वाजवण्यापासून सुरू झालेल्या या प्रवासाला विशाल रूप मिळाले आणि सुरुवातीला ‘पेक्टोराल्झ’, त्यानंतर ‘स्टारफिश’ अशा नावांनी सुरू झालेला हा चमू ‘कोल्डप्ले’ नावाने ओळखला जाऊ लागला. या चमूचा संस्थापक क्रिस मार्टिनने एवढय़ावरच न थांबता ‘ग्लोबल सिटिझन’ या संस्थेसह आपल्या बँडची लोकप्रियता जोडून न्यूयॉर्क शहरातच अनेक कार्यक्रम केले.

भारतात सामाजिक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने पंधरा वर्षांचा ठोस कार्यक्रम हाती घेऊन संस्थेने ‘ग्लोबल एज्युकेशन अँड लीडरशिप फाऊंडेशन’ या भारतीय सामाजिक संस्थेच्या मदतीने ‘ग्लोबल सिटिझन इंडिया’ ही मोहीम सुरू केली आहे. आज मुंबईत पहिल्यांदाच वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर हा फेस्टिव्हल रंगणार आहे. ‘कोल्डप्ले’ बँडचा प्रमुख सूत्रधार क्रिस मार्टिन गेली अनेक वर्षे या संस्थेचे प्रतिनिधित्व करत असून भारतात होणाऱ्या या महोत्सवासासाठी तो खास लाइव्ह शो करणार आहे. ‘कोल्डप्ले’बरोबरच अमेरिकन रॅपर जे झे ही या महोत्सवात सामील होणार असून बॉलीवूड सिताऱ्यांचाही यात महत्त्वाचा सहभाग असणार आहे.

संगीतकार ए. आर. रेहमान, शंकर-एहसान-लॉय, गायक अरिजीत सिंग यांच्याबरोबर आमिर खान, अमिताभ बच्चन, फरहान अख्तर, कतरिना कैफ, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, करिना कपूर-खान, दिया मिर्झा अशी भलीमोठी स्टारमंडळीही या महोत्सवात आणि मोहिमेत सक्रिय सहभागी होणार आहेत. दर्जेदार शिक्षण, लैंगिक समानता आणि पिण्यासाठी स्वच्छ पाणी-स्वच्छता या तीन मुद्दय़ांवर ‘ग्लोबल सिटिझन इंडिया’ काम करणार असून त्या त्या क्षेत्रात कार्यशील असलेले बॉलीवूड कलाकार या मोहिमेशी जोडले गेले आहेत.