बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नाची घटीका आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. २ डिसेंबरला ही जोडी जोधपुरमध्ये हिंदू पद्धतीने लग्न करणार आहेत. त्यामुळे हा लग्नसोहळा दैदीप्यमान असेल यात शंका नाही. हिंदू पद्धतीमध्ये कन्यादानाला खूप महत्व असतं. प्रियांकाच्या वडीलांच २०१३ मध्ये निधन झाल्यामुळे तिचं कन्यादान कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता प्रियांकाचं कन्यादान तिचे काका पवन चोप्रा आणि त्यांची पत्नी रीना करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रियांकाची चुलत बहिण परिणीती चोप्राचे आई-वडील रीना आणि पवन चोप्रा कन्यादान करणार आहेत. पवन चोप्रा हे प्रियांकाचे धाकटे काका आहेत. या लग्नासोहळ्याला ८० लोकांची उपस्थिती असून यात केवळ जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित असणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान,लग्नात सामील होणाऱ्या पाहुण्यांना प्रियांका आणि निक एक खास भेट देणार आहेत. या पाहुण्यांना स्पेशल पर्सनलाईज्ड चांदीचे नाणे भेट म्हणून दिले जाणार आहे. या नाण्याच्या एका बाजूला ‘एनपी’ म्हणजे निक आणि प्रियांका या नावाचे इंग्रजी आद्याक्षर लिहिलेले असेल. तर दुसऱ्या बाजूला गणेश आणि लक्ष्मीची प्रतिमा कोरलेली असेल.