बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्यात घट्ट मैत्री असल्याचे आपण सारेच जाणतो. सध्या प्रियाकां अमेरिकेत क्वाटिंकोच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. पण काही झाले तरी तिच्या जवळच्या मित्राला मात्र विसरलेली नाही. ती वेळात वेळ काढून रणवीरला फोन करते. आता हेच पाहा ना मध्यरात्री तिला रणवीरची आठवण आली आणि तिने त्याला व्हिडिओ कॉलही केला. रणवीर सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘गली बॉय’च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. प्रियांकाने रणवीरला जेव्हा फोन केला तेव्हा तो गाडीत बसला होता प्रवास करत होता.

प्रियांका चोप्राने रणवीरला इन्स्टाग्रामवरुन लाइव्ह व्हिडिओ चॅट केले. प्रियांकाने तिचा हा व्हिडिओ कॉल सोशल मीडियावरही शेअर केला. हा कॉल शेअर करताना तिने लिहिले की, ‘धन्यवाद रणवीर सिंह. तू खरंच एक रॉकस्टार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तू दिलेला संदेश फार महत्त्वपूर्ण आहे.’ या व्हिडिओ कॉलमध्ये प्रियांकाने रणवीरला महिला दिनानिमित्त तू काय खास करणार आहे? तसेच या दिवशी तू काय घालणार आहेस? असे अनेक प्रश्न विचारले.

तिच्या प्रश्नाचे उत्तर देताना रणवीर म्हणाला की, ‘हिरव्या रंगाचा स्कर्ट घातला आहे. झोयाने कालच सेटवर सगळ्यांना स्कर्ट घालण्याचे आदेश दिले होते. सगळ्यांनी म्हणजे स्पॉटबॉयपासून ते सेटवरच्या प्रत्येक माणसाने स्कर्ट घातले होते.’ यावर जुन्या आठवणींना उजाळा देत प्रियांका म्हणाली की, ‘याआधीही आम्ही तुला स्कर्टमध्ये पाहिले आहे. ‘बाजीराव मस्तानी’च्या प्रमोशनवेळी तू स्कर्ट घातला होतास.’

काही वेळ रणवीर आणि प्रियांका जुन्या आठवणींमध्ये रमताना दिसले. नंतर रणवीर म्हणाला की, ‘तुझी खूप आठवण येते. लवकर भारतात परत ये. खूप दिवसांनी तुझ्याशी बोलून बरं वाटलं.’ यावर प्रियांका म्हणाली की, ‘हा रन्नो, माझ्याकडे एक प्लॅन आहे.’